एका नकाराने घेतले दोन जीव ! विरारमध्ये माय-लेकीची निर्घृण हत्या

विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार पश्चिमेतील न्यू विवा कॉलेज परिसरातील पूनम आकांक्षा इमारतीत लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीसह तिच्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भाड्याने राहत असलेल्या नॅन्सी मिश्रा (वय 24) आणि तिची आई सरिता मिश्रा (वय 45) यांच्यावर आज सकाळी सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणातील आरोपी शिवम उपाध्याय (वय 25) याने घरात घुसून तोडफोड करत नॅन्सी आणि तिच्या आईवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःचाही जीव संपवण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी संजीवनी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मागील दोन वर्षांपासून आरोपी शिवम आणि नॅन्सी यांच्यात प्रेमसंबंध होते. या नात्याला लग्नाचे स्वरूप देण्यासाठी आरोपी काल रात्री आपल्या नातेवाईकांसह नॅन्सीच्या घरी गेला होता. मात्र, या विवाहाला नॅन्सीच्या आईने विरोध दर्शविला आणि नॅन्सीनेही लग्नास नकार दिला. याच रागातून संतप्त झालेल्या आरोपीने आज दुपारी साडेबाराच्या सुमारास धारदार हत्यार घेऊन नॅन्सीच्या घरात प्रवेश केला आणि नॅन्सी व तिच्या आईवर सपासप वार करत त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

घरातून आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसताच पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच बोलींज पोलीस ठाणेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली होती.

घटनेची माहिती मिळताच बोलींज पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन दोन्ही मृतदेह पुढील तपासासाठी शवविच्छेदनास पाठवले असून या दुहेरी हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे विरार परिसरात एकच खळबळ उडाली असून बोलींज पोलीस पुढील तपास करत आहेत.