
संगीताचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाला जगात ओळख आहे. परंतु, पिंपरी-चिंचवडला जगात काेण ओळखत नसल्याचे विधान महापालिका आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी केले.पिंपरी-चिंचवड महापालिका संचलित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ व अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जूनमध्ये आयाेजित केलेल्या ‘गांधर्व मंच’ संगीत स्पर्धेची माहिती देण्यासाठी आयुक्तांची साेमवारी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी डाॅ. सूर्यवंशी यांनी हे विधान केले.

‘गांधर्व महाविद्यालयाचे १२५ वे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. जगामध्ये जाळे विस्तारलेले महाविद्यालय प्रसिद्ध आहे. पिंपरी-चिंचवडला जगात काेण ओळखत नाही. पण, गांधर्व महाविद्यालयाला ओळखतात. त्याच्या मदतीने शहराला फायदा हाेईल,’ असे आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले. पत्रकारांनी शहराची ओळख जगभर असल्याचे सांगताच आयुक्तांनी दाेन वेळा शहराला जगात काेण ओळखत नाही, असे उद्गार काढले.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव सोहळा, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या स्थापनेचे १२५ वे वर्ष या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून संतपीठाच्या माध्यमातून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ या आंतरराष्ट्रीय संस्थेशी सलग्नता ठेवून ‘गांधर्व मंच’ या संगीत स्पर्धेचे आयाेजन केले आहे. त्यामध्ये एकल तबला वादन, पखवाज वादन, शास्त्रीय गायन आणि संतरचित अभंग गायनाच्या स्पर्धा होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.










