नसरापूर चिमुरडी अत्याचार-खून प्रकरण: ३० साक्षीदारांची साक्ष पूर्ण; आज फॉरेन्सिक तज्ज्ञांची महत्त्वाची साक्ष!

भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि खून प्रकरणाची विशेष न्यायालयात नियमित ‘इन-कॅमेरा’ सुनावणी सुरू आहे. या अत्यंत संवेदनशील खटल्यामध्ये गुरुवारी (दि. ४) विशेष न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली, ज्यामध्ये तब्बल ७ वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, आज शुक्रवारी (दि. ५) या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या न्यायवैद्यक विज्ञानतज्ञांची साक्ष नोंदवली जाणार आहे.

१,१०० पानांचे दोषारोपपत्र; आतापर्यंत ३० साक्षीदार तपासले

विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात राजगड पोलिसांनी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५, रा. भोर) याच्याविरोधात तब्बल १ हजार १०० पानांचे भक्कम दोषारोपपत्र दाखल केले आहे. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर यांनी न्यायालयात एकूण ८२ साक्षीदारांची यादी सादर केली असून, त्यापैकी आतापर्यंत ३० साक्षीदारांची साक्ष नोंदवून पूर्ण झाली आहे.

लहान मुलांची कोर्टात निर्भीड साक्ष, आरोपीला ओळखले!

या खटल्यात मंगळवारी तीन प्रत्यक्षदर्शी लहान मुलांची साक्ष नोंदवण्यात आली. या चिमुरड्यांनी अत्यंत निर्भीडपणे, “आम्ही आरोपीला पीडितेसोबत पत्र्याच्या शेडमध्ये पाहिलं होतं,” अशी साक्ष दिली. इतकेच नव्हे तर, येरवडा कारागृहात झालेल्या ओळखपरेडमध्ये आणि कोर्टात ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे हजर असलेल्या नराधम आरोपीला या मुलांनी अचूक ओळखले आहे.

महत्त्वाचे पुरावे आणि ग्रामस्थांची साथ

चिमुरडीचे अपहरण करून घेऊन जाणाऱ्या आरोपीला ग्रामस्थांनी सीसीटीव्ही चित्रीकरणात ओळखले आहे.पीडितेचे अपहरण झाल्यानंतर तिचा शोध घेणाऱ्या ३ ग्रामस्थांनीही न्यायालयात महत्त्वाची साक्ष दिली.यापूर्वी पीडितेची आई, वडील, आणि मृत्यूच्या कारणांचा पंचनामा करणारे पंच अशा ६ प्रमुख साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली आहे.

आरोपीवर आणखी एक कलम वाढणार?

गुन्हा केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याच्याविरुद्ध दाखल आरोपपत्रात ‘पुरावा नष्ट करणे’ हे कलम वाढविण्याचा अर्ज सरकार पक्षातर्फे न्यायालयात करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असून, नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.