
कायद्याचा धाक उरलाय की नाही? असा प्रश्न निर्माण करणारी एक संतापजनक घटना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात घडली आहे. अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारांना मुरूम माफियांनी चक्क चालत्या जेसीबीला लटकवून तब्बल ३ ते ४ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला. बोरी नाईक परिसरात ५ मे रोजी मध्यरात्री हा अंगावर काटा आणणारा थरार घडला.

नेमकी घटना काय?
बोरी नाईक परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे निकाळजे यांनी महसूल पथकासह मध्यरात्री ११.३० च्या सुमारास घटनास्थळी धाड टाकली. त्यांच्यासोबत ग्राम महसूल अधिकारी मोहन पवार, आनंद मस्के आणि महसूल सेवक नीलेश तिरपुडे उपस्थित होते.

अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न
महसूल पथक कारवाई करत असतानाच माफियांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला. एका ट्रॅक्टरचालकाने थेट नायब तहसीलदार निकाळजे यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, निकाळजे यांनी प्रसंगावधान राखत बाजूला उडी घेतल्याने त्यांचा जीव थोडक्यात वाचला.
जेसीबीला लटकवून ३-४ किलोमीटर फरफटत नेले
पथकाने अवैध उत्खनन करणारा जेसीबी (क्र. MH 40 CQ 2388) अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी चालक मयूर थोटे याने वाहन थांबवण्याऐवजी पळवण्यास सुरुवात केली. त्याला थांबवण्यासाठी निकाळजे जेसीबीवर चढले, मात्र निर्ढावलेल्या चालकाने त्यांना लटकलेल्या अवस्थेतच गाडी वेगाने पळवली. निकाळजे यांना खाली पाडून गंभीर जखम करण्याच्या उद्देशाने चालकाने जेसीबी मुद्दाम काटेरी झुडपांतून चालवला. तब्बल ३ ते ४ किलोमीटरपर्यंत हा जीवघेणा थरार सुरू होता. यात निकाळजे यांचा शर्ट फाटला असून त्यांच्या हाताला जखमा झाल्या आहेत.
पोलिस समोर दिसताच चालक नरमल्याने टळली मोठी दुर्घटना
या थराराची माहिती मिळताच वेलतूर पोलीस स्टेशनचे एपीआय राऊत पथकासह तातडीने रवाना झाले. समोरून पोलिसांची गाडी येत असल्याचे पाहून चालक मयूर थोटे घाबरला आणि त्याने जेसीबी थांबवला. जर पोलीस वेळेवर पोहोचले नसते, तर मोठी दुर्घटना घडली असती.
आरोपीला बेड्या
याप्रकरणी कुही पोलिसांनी तत्परता दाखवत जेसीबीचालक मयूर थोटे (रा. दहेगाव, ता. मौदा) याला बुधवारी अटक केली आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि सरकारी अधिकाऱ्याच्या जिवावर बेतल्याप्रकरणी त्याच्यावर कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










