
पदोन्नतीचा आनंद आणि मुंबईतील बदलीचे स्वप्न रंगवत असतानाच, एका चुकीच्या निर्णयाने सर्व काही पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले आहे. २८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, लाच घेण्याच्या एक दिवस आधीच त्यांची पदोन्नती होऊन त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते, मात्र आता तो आदेशही रद्द करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

वैशाली तोटेवार या पुणे पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होत्या. जमिनीच्या वादाशी संबंधित एका तक्रार अर्जाची चौकशी त्यांच्याकडे होती. या चौकशीत तक्रारदाराला मदत करण्यासाठी त्यांनी तब्बल ३० लाख रुपयांची मागणी केली होती. यातील २ लाख रुपये त्यांनी आधीच स्वीकारले होते, तर उर्वरित २८ लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पुण्यातील बंडगार्डन परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सापळा रचून रंगेहाथ पकडले.
पदोन्नती मिळाली, पण वर्दी हुकली!
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, तोटेवार यांची पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती झाली होती. त्यांची बदली मुंबई येथे करण्यात आली होती आणि पुणे पोलीस दलातून त्यांना अधिकृतपणे कार्यमुक्त देखील करण्यात आले होते. नवीन पदावर रुजू होण्यापूर्वीच त्यांनी हा ‘हातसाफ’ करण्याचा प्रयत्न केला, जो त्यांच्या अंगलट आला.
लाचखोरीच्या या गंभीर प्रकरणानंतर पोलीस विभागाने तत्काळ पावले उचलली आहेत. वैशाली तोटेवार यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांचा पदोन्नतीनंतरचा कार्यमुक्तीचा आदेश रद्द करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.या प्रकरणात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का? याचा तपास आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे.पुणे पोलीस दलातील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारे कारवाई झाल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.










