
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट-युजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या जाळ्यात अडकलेला ‘आरसीसी’ क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. पुण्यातून अटक झाल्यानंतर मोटेगावकरची सीबीआयकडून कसून चौकशी सुरू असतानाच, आता त्याचा एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. स्वतःला विज्ञानाचा प्राध्यापक म्हणवून घेणाऱ्या मोटेगावकरचा हा अवतार पाहून नेटकरी आणि पालक थक्क झाले आहेत.

हातात तांब्या, झाडाची पानं अन् थेट बाकावर उडी!

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये शिवराज मोटेगावकर वर्गातील बाकावर चढून उभा असल्याचं दिसत आहे. त्याच्या एका हातात पाण्याचा तांब्या असून दुसऱ्या हातात झाडाची पाने आहेत. वर्गात समोर बसलेल्या विद्यार्थ्यांवर तो अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या स्टाईलने पाणी शिंपडताना या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
“१४४ वर्षांनंतर असा योग…” व्हिडिओतील संवाद थक्क करणारा
विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडत असताना मोटेगावकर व्हिडिओमध्ये म्हणतोय, “तुम्ही सर्वजण एम्समध्ये लागणार आहात, १४४ वर्षांनंतर असा योग आला आहे.” परीक्षा किंवा निकालाच्या आधी विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे पाणी शिंपडून, त्यांना ‘यशाचे आशीर्वाद’ देण्याची एक कथित प्रतिमा मोटेगावकरभोवती तयार करण्यात आली होती. त्याची हीच अजब आणि वादग्रस्त शैली पूर्वी विद्यार्थी आणि पालकांमध्ये चर्चेचा विषय ठरायची. मात्र, आता पेपरफुटीत नाव आल्यानंतर या व्हिडिओमागचे सत्य आणि त्याच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सीबीआयकडून मोटेगावकरच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी
NEET-UG पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला सीबीआयने पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण रॅकेटमध्ये मोटेगावकरची भूमिका काय होती? त्याचे कोचिंग नेटवर्क कसे चालत होते? आणि या संपूर्ण प्रकरणात किती कोटींचे आर्थिक व्यवहार झाले? याचे विविध पैलू सध्या तपास यंत्रणांकडून तपासले जात आहेत.
एकीकडे विज्ञानाचा प्राध्यापक म्हणवून घ्यायचं आणि दुसरीकडे अशा प्रकारे चमत्कारांचे दावे करत विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडायचं, मोटेगावकरच्या या दुटप्पी भूमिकेवर आता सोशल मीडियावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.










