
मीरा रोड परिसरामधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे एका अवघ्या चार वर्षांच्या चिमुरड्याची त्याच्याच आईच्या प्रियकराने कथितपणे बेदम मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष गुन्ह्यामागील नेमका हेतू अजूनही स्पष्ट झाला नसून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत संशयावरून शंभू शर्मा नावाच्या आरोपीला अटक केली आहे.

लिव्ह-इन-रिलेशनशिप अन् चिमुरड्याचा अंत

पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत मुलाची आई आरोपी शंभू शर्मा याच्यासोबत मीरा रोड परिसरामध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये (एकत्र) राहत होती. घटनेच्या दिवशी आरोपीने घरात असताना या निष्पाप मुलावर अतिशय निर्घृणपणे हल्ला केला, ज्यामध्ये त्या ४ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने चिमुरड्याचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला होता.
हत्येला नैसर्गिक मृत्यू दाखवण्याचा प्रयत्न फसला
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करताना मुलाच्या शरीरावर काही संशयास्पद जखमांच्या खुणा पाहिल्या. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी मृतदेह तातडीने पोस्टमार्टेमसाठी पाठवला.त्यानंतर आलेल्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झाला. मुलाचा मृत्यू नैसर्गिक नसून शरीराला झालेल्या गंभीर अंतर्गत दुखापतींमुळे झाला असल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली. या रिपोर्टमुळे आरोपीचा बनाव पुरता उघडा पडला.
आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली
पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान करत शंभू शर्मा याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवला. अखेर पोलिसांच्या चौकशीत त्याने चिमुरड्याला बेदम मारहाण केल्याची कबुली दिली. मंगळवारी (२ जून) आरोपी शंभू शर्माविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपीने एवढ्या लहान मुलावर एवढा भीषण हल्ला का केला? आणि या संपूर्ण प्रकाराची माहिती मृत मुलाच्या आईला होती का? ती या गुन्ह्यात सामील आहे का? या सर्व बाजूंचा तपास सध्या काशिमीरा पोलीस करत आहेत.










