इन्स्टाग्रामवर लाखो लाईक्स, पण वास्तवात हातसफाई; लातूरमध्ये प्रसिद्ध रीलस्टार प्रियांका कांबळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात रीलस्टारचा मोठा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामवर लाईक्स आणि व्ह्यूज मिळावे यासाठी तरुण-तरुणी वाट्टेल ते करताना दिसतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात स्टार होणाऱ्या अशा रीलस्टारना लाईक करणारा एक मोठा वर्ग समाजात तयार झाला आहे.

मात्र, लातूरमधून अशाच एका प्रसिद्ध रीलस्टार तरुणीचा धक्कादायक कारनामा समोर आला आहे. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी ही रीलस्टार चक्क चोरी करताना रंगेहात पकडली गेल्याने पोलीसही चक्रावले आहेत. लातूर पोलिसांनी या तरुणीला अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे.प्रियांका कांबळे असे अटक करण्यात आलेल्या रीलस्टार तरुणीचे नाव आहे.

३२ हजार फॉलोअर्स, पण कृत्य चोराचे!

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका कांबळे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास ३२ हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ती नेहमी आपल्या अकाऊंटवर वेगवेगळे व्हिडिओ आणि रील्स पोस्ट करत असते, ज्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सही मिळतात. मात्र, हीच रीलस्टार तरुणी लातूरच्या एमआयडीसी परिसरात चोरी करताना आढळून आली आहे.

ज्या कॅमेऱ्याने स्टार केले, त्याच कॅमेऱ्याने जेल दाखवली!

एमआयडीसी परिसरात सध्या एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकाम ठिकाणी लाईट फिटींगसाठी आणलेली आणि वापरली जाणारी महागडी वायर ठेवण्यात आली होती. या वायरची किंमत जवळपास ४१ हजार रुपये इतकी होती. हीच वायर या रीलस्टार म्हणवणाऱ्या प्रियांकाने चोरली आणि ती तिथून पसार झाली.

ज्या कॅमेऱ्याच्या जोरावर प्रियांका रीलस्टार बनली, अखेर एका दुसऱ्या कॅमेऱ्यानेच तिची पोलखोल केली. बांधकाम साईटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. चोरी करत असताना प्रियांका या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली. चोरीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तातडीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

रील्स स्टार जोमात, फॉलोअर्स कोमात!

घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेने या चोरीचा तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले असता, त्यात प्रियांका कांबळे ही वायर चोरताना स्पष्टपणे दिसली. त्यानंतर गुन्हे शाखेने तात्काळ सापळा रचून या तरुणीला ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.

चोरीचे कारण अद्याप अस्पष्ट

सोशल मीडियावर स्टार असलेल्या या तरुणीने अवघ्या ४१ हजारांच्या वायरसाठी एवढी मोठी चोरी का केली? याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, या नामांकित रीलस्टारने चोरी केल्याची बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली आहे. त्यामुळे तिच्या ३२ हजार फॉलोअर्सना मोठा धक्का बसला आहे. सध्या प्रियांका पोलिसांच्या कोठडीत असून, “तिने चोरी जोमात केली पण तिचे फॉलोअर्स मात्र कोमात गेले”, अशीच चर्चा लातूरमध्ये रंगली आहे.