आळंदी मर्डर मिस्ट्रीचा मास्टरमाइंड जेरबंद!

देवाची आळंदी ही काल सकाळी दुहेरी हत्याकांडाने हादरली होती. आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील हनुमान वाडी या ठिकाणी एका तरुणाने, ७० वर्षीय महिला आणि एका सहा वर्षाच्या मुलीची धारदार शस्त्राने हत्या केली. याप्रकरणी आता पोलिसांनी २४ तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे मृत महिला प्रेमसंबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने तरुणाने हे पाऊल उचलले असल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव विनायक तुकाराम भवारी (वय ३१) असे आहे. तर मृत महिलेचे नाव मंगल चंद्रकांत शिंदे असे आहे. तसेच मृत चिमुकलीचे नाव धनश्री सोनू केदारी असे आहे. विनायक भवारी याचे ४७ वर्षीय महिला संगीता केदारीशी प्रेमसंबंध होते. संगीता केदारी ही धनश्रीची नात्याने आजी होती.

मात्र विनायकचे इतरही काही महिलांशी विवाहबाह्य प्रेम संबंध असल्याने संगीताने त्याला आपल्या घरात राहण्यास मज्जाव केला होता. संगीता कामावर जाताना धनश्रीला शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे यांच्या घरी सांभाळण्यासाठी ठेवून जायची. दरम्यान विनायकला संगीताहीने घरात राहण्यास नकार दिल्याने तो संतापला होता. शेजारी राहणाऱ्या मंगल यांच्या सांगण्यावरून संगीताने असं केलं असावं अशी शंका त्याला होती.

या शंकेतून विनायकने मंगल यांच्या घरी जाऊन धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली. तसेच शेजारी असलेल्या ६ वर्षीय धनश्रीची देखील निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक तीन पोलीस पथकाने पुणे नाशिक रोडवरील आळेफाटा या ठिकाणी जाऊन विनायकला बेड्या ठोकल्या आहेत.याप्रकरणी पुढील तपास सुरु असून या घटनेने आळंदी हादरली आहे.