शहीद की बेवारस? ; जवानाचा मृतदेह तीन दिवस हॉस्पिटलमध्ये पडून

केंद्रीय राखीव पोलिस बलाच्या (सीआरपीएफ) जवानाचा मृतदेह सोमाटणे फाटा येथे आढळला. पोलिसांत अनोळखी मृतदेहप्रकरणी नोंद झाली. मात्र, त्याबाबत माहिती न मिळाल्याने कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याबाबत तक्रार केली.

तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात दोन्ही घटनांची नोंद होऊनही पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे जवानाचा मृतदेह तीन दिवस रुग्णालयातच होता. अखेर नातेवाईक आणि मित्रांनी शोध घेतल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवण्यात आली.

प्रशांत कदम असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. प्रशांत यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. सीआरपीएफ जवान असलेले प्रशांत कदम गुजरातमधील गांधीनगर येथे कार्यरत होते. ते तळेगाव दाभाडे येथून २५ मार्चला गांधीनगर येथे जाण्यासाठी निघाले. लोकल रेल्वेने ते लोणावळा येथे गेले. तेथून ते लोकल रेल्वेने परत तळेगावकडे आले. मात्र, याबाबत कुटुंबीयांना माहिती नव्हती.त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. दरम्यान, गांधीनगर येथील त्यांच्या कार्यालयाकडून कुटुंबीयांकडे विचारणा झाली. प्रशांत पोहोचले नसल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाइकांनी २७ मार्चला ते बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दाखल केली. सोशल मीडियावरही पोस्ट व्हायरल केली.

दरम्यान, २५ मार्चला रात्री साडेनऊच्या सुमारास सोमाटणे फाटा परिसरात अनोळखी मृतदेह आढळला. तळेगाव दाभाडे पोलिसांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह रुग्णालयात नेला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन केले. अनोळखी मृतदेहाबाबत तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात नोंद केली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वर्णन, फोटो आणि बेपत्ता असलेल्या प्रशांत कदम यांचे वर्णन, फोटो मिळते-जुळते असूनही पोलिसांनी त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला नाही.