
प्रसिद्ध भोंदू बाबा मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याच्या अडचणी दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. पुण्यातील एका व्यापाऱ्याची भोंदूगिरीच्या जोरावर १ लाख ७६ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी करमाळा न्यायालयाने मनोहर मामासह त्याच्या तीन साथीदारांना १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पहिल्या गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडी संपताच दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस कोठडी मिळाल्याने आता मामाचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.

नेमके प्रकरण काय?
पुण्यातील धनकवडी येथील व्यापारी दलाराम सुतार यांना व्यवसायात यश येत नव्हते आणि त्यांना मणक्याचाही तीव्र त्रास होता. याचाच फायदा घेऊन मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांनी तंत्र-मंत्राच्या नावाखाली त्यांना जाळ्यात ओढले. मणक्याचा त्रास दूर करण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून सुरुवातीला ५ हजार आणि नंतर ५० हजार रुपये उकळले.

५० हजारांची ‘हळद’ आणि मंतरलेला धागा
फसवणुकीचा हा प्रकार इतका अघोरी होता की, ५० हजार रुपये घेतल्यानंतर आरोपींनी एका पांढऱ्या डब्यात पिवळ्या रंगाची हळदीसारखी पावडर ‘भंडारा’ म्हणून दिली. त्यानंतर गळ्यात मंतरलेला धागा बांधण्यासाठी १ लाख ५१ हजारांची मागणी करण्यात आली. पुण्याच्या हडपसर भागात व्यापाऱ्याला बोलावून त्यांच्या गळ्यात धागा बांधला आणि राख व तांदळाचे दाणे असलेली पुडी पाण्यात टाकून पिण्यास सांगितली. मात्र, इतके पैसे देऊन आणि हे अघोरी उपाय करूनही काहीही फरक पडला नाही, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे व्यापाऱ्याच्या लक्षात आले.
न्यायालयाचा दणका आणि पोलीस कारवाई
व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी मनोहर भोसले, विशाल वाघमारे आणि नरेंद्र सांगळे यांच्याविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ५ मे रोजी कडक पोलीस बंदोबस्तात आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायमूर्ती शर्मा यांनी तिघांनाही १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.










