
पूर्ववैमनस्याचा राग मनात धरून हवेली तालुक्यातील तरडे ग्रामपंचायत हद्दीतील गवते मळा परिसरात माजी सरपंच आणि त्यांच्या भावावर लोखंडी रॉड व दगडांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “तू आधीपासूनच माझ्या डोक्यात होतास, तुझा आज संतोष देशमुखच करतो,” अशी थेट धमकी देत आरोपींनी हा थरार घडवून आणला. रविवारी (ता. ३१) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी सरपंचासह भाऊ गंभीर जखमी

या प्राणघातक हल्ल्यात माजी सरपंच अभिषेक प्रभाकर दाभाडे (वय २७) आणि त्यांचे भाऊ समीर प्रभाकर दाभाडे (दोघे रा. गवते मळा, तरडे, ता. हवेली) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी अभिषेक दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंपक उत्तम गवते, आप्पा दीपक गवते, रूपक उत्तम गवते आणि दीपक उत्तम गवते (सर्व रा. गवतेमळा, तरडे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयंतीचा कार्यक्रम आटोपून परतताना वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे भाऊ समीर दाभाडे हे रविवारी रात्री गावात अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जेवणाचा कार्यक्रम आटोपून घरासमोरील बाकावर मित्रांसोबत बसले होते. त्याच वेळी जुन्या वादाची खुन्नस काढून चंपक गवते आणि त्याचा पुतण्या आप्पा गवते तिथे दुचाकीवरून आले. त्यांनी समीर यांना विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.वाद वाढू नये म्हणून समीर यांनी तात्काळ आपले मामा आकाश चौधरी यांना फोन केला. मामाने फोनवरूनच चंपक याला “जे काही असेल ते सकाळी समोरासमोर मिटवू” असे सांगून शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
डोक्यात रॉडचा प्रहार आणि दगडफेक
मामांनी फोनवर समजावून सांगितल्यानंतर काही वेळातच तिथे रूपक गवते आणि दीपक गवते धावून आले. त्यांनी समीर यांना मारहाण सुरू केली. भाऊ संकटात असल्याचे समजताच माजी सरपंच अभिषेक दाभाडे त्याला वाचवण्यासाठी घटनास्थळी धावले.
थेट जीवे मारण्याची धमकी…
अभिषेक भांडण सोडवत असतानाच, चंपक गवते याने हातातील लोखंडी रॉडने थेट अभिषेक यांच्या डोक्यात जोरात प्रहार केला. यामध्ये अभिषेक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मारहाण सुरू असतानाच चंपक याने “तुझा आज संतोष देशमुखच करतो” अशी धमकी दिली. जखमी दाभाडे बंधू जीव वाचवण्यासाठी तेथून पळत सुटले असता, आरोपींनी त्यांच्या दिशेने जमिनीवर पडलेले मोठे दगड फेकून मारले.
लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल
हल्ल्याच्या या थरारानंतर जखमींनी तातडीने लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार वैशाली नागवडे करत आहेत.










