
पुण्यातील ग्रामीण भागातही आता भाईगिरी आणि दहशतीचे प्रकार वाढू लागल्याचे समोर येत आहे. जुन्नर शहरातील मुख्य निवासी बाजारपेठ असलेल्या सदाबाजार पेठेत मंगळवारी (२ जून) सकाळी दहाच्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळक्याने भररस्त्यात आरडाओरडा करत लोखंडी धारदार कोयते आणि रॉड नाचवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जुन्नर शहराच्या इतिहासात असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपींपैकी एकाला अटक केली आहे.

एकाच कुटुंबातील सदस्यांसह ६ जणांवर गुन्हा

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार कैलास केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुन्नर पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अरबाज हमीद हलवाई, इरफान माजिद हलवाई, शायरा माजीद हलवाई, मुस्कान अरबाज हलवाई, मोहसीन इकबाल आतार आणि एका अल्पवयीन मुलाचा (सर्व रा. सदाबाजारपेठ, जुन्नर) समावेश आहे. या टोळक्याने भरबाजारपेठेत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला.
…अन् हातात कोयते घेऊन अंगावर धावले!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास बाजारपेठेत वर्दळ सुरू असताना, आरोपी इरफान याच्या दुकानासमोर अरबाज आणि एक अल्पवयीन मुलगा हातामध्ये धारदार कोयते घेऊन एकमेकांच्या अंगावर धावून जात होते. तर दुसरीकडे, इरफान आणि त्याचे इतर साथीदार लोखंडी रॉड हातात घेऊन परिसरात दहशत माजवीत होते. हे सर्वजण भररस्त्यात मोठ्याने आरडाओरडा आणि अश्लील शिवीगाळ करत होते, ज्यामुळे परिसरातील वातावरण कमालीचे तणावपूर्ण बनले होते.
एकाला अटक, पोलिसांकडून शोध सुरू
या गुंडगिरीची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जुन्नर पोलिसांनी या टोळक्यातील आरोपी इरफान माजिद हलवाई याला ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सागर हिले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
जुन्नरकर हादरले; कठोर कारवाईची मागणी
जुन्नर शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत भरदिवसा कोयता आणि रॉड दाखवून दहशत माजविण्याचा प्रकार घडल्याने स्थानिक नागरिक, महिला आणि व्यापारी वर्गामध्ये प्रचंड भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्नर सारख्या शांत शहरात असा गंभीर प्रकार पहिल्यांदाच घडल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सर्व आरोपींवर तातडीने आणि अत्यंत कठोर कारवाई करावी, अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून केली जात आहे.










