
अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या अशोक खरातचे एक-एक कारनामे समोर येऊ लागले आहेत. अटक केल्यानंतर सुरुवातीला पोलिसांनाच धर्म, शाप-कोपाचा धाक दाखवत धमकावणारा अशोक खरात चांगलाच हतबल झाल्याची माहिती आहे.

पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली असून त्याचा माज उतरला असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून तपासाचा फास घट्ट केला जात असल्यानं खरात कोठडीतच ढसाढसा रडत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, खरातला आज कोर्टात हजर करण्यात आले. खरातविरोधात आता तिसऱ्या गुन्ह्याचा खटला सुरू होणार आहे.

अटक झाल्यानंतरच्या पहिल्या आठवड्यात खरातचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला होता. तपासासाठी आलेल्या एसआयटी अधिकाऱ्यांशी तो केवळ उद्धटपणे वागलाच नाही, तर त्यांना उलट शाप देण्याचाही प्रयत्न करत होता. “तुम्ही पाप करत आहात, तुमच्यावर देवाचा कोप होईल,” अशा शब्दांत त्याने पोलिसांवर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. राजकीय पाठबळ पाठीशी असल्याने कोणीही आपले काहीही वाकडे करू शकणार नाही, अशा भ्रमात तो होता.
मात्र, एसआयटीने जसा पुराव्यांचा डोंगर उभा केला आणि खरातच्या काळ्या कारनाम्यांची पोलखोल सुरू केली, तशी त्याची परिस्थिती बदलली. सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानंतर आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच खरातचा सारा अहंकार गळून पडला आहे. जो बाबा पोलिसांना घाबरवत होता, तोच आता कोठडीत दोन-तीन वेळा रडला असून, ढसाढसा रडत तो आता पोलिसांसमोर नरमाईची भूमिका घेत असल्याची माहिती दिली.










