खरात कनेक्शन आणि कोटींचे व्यवहार! चाकणकरांच्या बहिणीला ईडीचा दणका

भोंदूबाबा अशोक खरात संबंधित झालेल्या विविध व्यवहारांप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने समन्स बजावले आहे.पुढील आठवड्यात ईडीकडून त्यांच्या चौकशीची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईडीची चौकशी हा रुपाली चाकणकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेली विशेष जवळीक तसेच त्याच्या मंदिराच्या ट्रस्टवर रूपाली चाकणकर या सदस्य असल्याने त्यांची सलगी अधोरेखित होत होती. महिला अत्याचारासारखआ गंभीर गुन्ह्याविषयी आरोप झाल्याने राज्यातल्या सर्वच क्षेत्रातून चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.

अखेर चाकणकर यांनी राजीनामा देऊन त्यांच्याशी संबंधित चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढे चौकशीत रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांचेही जवळपास २५० हून अधिक कॉल खरातला झाल्याचे समोर आले. त्यानंतर चाकणकर यांच्या कुटुंबाच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली.

भोंदू अशोक खरात याने अनेकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन अनेक कारनामे केले आहेत. जगदंबा पतसंस्था आणि समता पतसंस्थेत अशोक खरात हा शेकडो खात्यांचा नॉमिनी (वारसदार) आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या नावानेही खाते उघडण्यात आले होते. समता पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहारांशी संबंधित, सुमारे तीन कोटींपेक्षा अधिक उलाढालीप्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे.

अशोक खरात याचे 33 हजार पेक्षा जास्त सेकंद रूपाली चाकणकर यांच्यासोबत बोलणे झाले आहे. तसेच रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांच्याशी खरातचे २३६ कॉल झाल्याचा दावाही केला जात आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आतापर्यंत भोंदूबाबा खरात याच्याशी कोणतेही आर्थिक व्यवहार केले नसल्याचे सांगितले होते. तसेच त्याच्या व्यक्तिगत आयुष्यासंबंधी आपल्याला काहीही माहीत नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र ज्या पतसंस्थेतून अशोक खरात याने कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला, त्याच पतसंस्थेत रुपाली चाकणकर यांची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकर यांचे बँक खाते असल्याचे समोर आले आहे. प्रतिभा गणेश चाकणकर यांच्या नावाने असलेल्या खात्यातून ४० ते ५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.