पार्किंगच्या किरकोळ वादातून खाकीचा थरार; पोलिसाने माय-लेकावर केला खुनी हल्ला

घरासमोर उभ्या वाहनांच्या वादातून पोलिसाने शेजारी तरुणासह त्याच्या आईला मारहाण करून धारदार चाकूने भोसकले. शुक्रवारी रात्री ११ वाजता गजानन महाराज मंदिर पुंडलिकनगर रस्त्यावर ही घटना घडली. यानंतर जमाव रस्त्यावर उतरल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांच्या वाहन विभागात कार्यरत कर्मचारी पुंडलिकनगर परिसरात वास्तव्यास आहे. गेल्या काही दिवसांपासून संबंधित कर्मचाऱ्याचे तेथेच राहणाऱ्या विकास नरवडे यांच्यासोबत घरासमोर वाहने उभी करण्यावरून वाद सुरू होता. शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दोघे समोर आल्यानंतर त्यांच्यात जुना वाद उफाळून आला. पोलिसाने नरवडे यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करीत मारहाण केली. वाद वाढताच त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली.

थेट गळ्यावर वार, प्रकृती गंभीर

नरवडे यांचे कुटुंब पोलिस कर्मचाऱ्याला आवरण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याने धारदार चाकूने नरवडे यांच्या गळ्यावर वार केले. यात नरवडे रक्तबंबाळ झाल्याचे दिसताच त्यांच्या आईने धाव घेतली. पोलिसाच्या हल्ल्यात त्यादेखील जखमी झाल्या. भर रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे क्षणार्धात स्थानिकांची गर्दी झाली. जखमी नरवडे व त्यांच्या आईला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने नरवडे यांची प्रकृती रात्री उशिरापर्यंत गंभीर असल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले.