न्याय मिळणारच! संदीपसिंह गिल यांची ग्वाही

नसरापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने आता आक्रमक पावले उचलली आहेत. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी स्वतः पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना न्यायाचा शब्द दिला आहे.

SP संदीपसिंह गिल यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट

सोमवारी धायरी येथे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी तपासाच्या सद्यस्थितीचा आढावा कुटुंबाला दिला आणि पोलीस यंत्रणा या घटनेचा अत्यंत गांभीर्याने तपास करत असल्याचे स्पष्ट केले.

खटला ‘फास्ट ट्रॅक’वर चालणार!

या प्रकरणातील आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस अधीक्षक गिल यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.लवकरात लवकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यावर पोलिसांचा भर आहे.
शासन आणि पोलीस यंत्रणेने याप्रकरणी अत्यंत कठोर भूमिका घेतली असून आरोपीला कोणताही थारा दिला जाणार नाही, अशी ग्वाही गिल यांनी दिली.

दोन महिला अधिकाऱ्यांचे विशेष पथक तैनात

या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी एका विशेष पथकाची (SIT) नेमणूक केली आहे. या पथकाचे वैशिष्ट्य म्हणजे या तपासात संवेदनशीलता जपण्यासाठी आणि पीडित कुटुंबाशी योग्य समन्वय साधण्यासाठी पथकात २ महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.अनुभवी अधिकाऱ्यांचे हे पथक तांत्रिक पुरावे आणि सबळ साक्ष गोळा करण्याचे काम करेल, जेणेकरून न्यायालयात आरोपीला पळवाट मिळणार नाही. “प्रशासन आणि शासन पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, न्याय प्रक्रियेत कोणताही विलंब होणार नाही,” असा ठाम विश्वास संदीपसिंह गिल यांनी यावेळी व्यक्त केला.