भोंदू अशोक खरातचं ‘पालघर कनेक्शन’ उघड!; कथित ‘मंतरलेल्या चिंचोक्यांचा’ फुटला फुगा

भोंदू अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे पालघरपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी काही उमेदवारांनी एका राजकीय नेत्याच्या मध्यस्थीने खरातची भेट घेतल्याचे समजते.

डिसेंबर २०२५मध्ये झालेल्या पालघर नगरपरिषद निवडणुकीदरम्यान, एका राजकीय पदाधिकाऱ्याने काही उमेदवारांची भेट खरातशी घालून दिली होती. यावेळी खरातने विजयाचा दावा करत एका प्लास्टिकच्या डबीत तांदूळ, हळद, लिंबू आणि दिव्यावर ठेवलेल्या चिंचोक्यावर ‘माझी शक्ती आदी शक्ती’ असा कथित मंत्र कोरून दिला होता. या डबीची पूजा केल्यास विजय निश्चित असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात हे सर्व उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले.

पालघर जिल्ह्यात सध्या अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक राजकारणी, उद्योगपती आणि निवृत्त अधिकाऱ्यांनी येथे मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या आहेत. खरातच्या संपर्कात असलेल्या पालघरमधील व्यक्तींमार्फत जिल्ह्यात काही संशयास्पद जमीन खरेदी – विक्रीचे व्यवहार झाले आहेत का? याचा सखोल तपास करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.