शिक्षकावर ठेवला विश्वास, पण बदल्यात मिळाल्या नरकयातना

जळगाव जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. ज्या गुरुला आपण देवाच्या स्थानी मानतो, त्याच गुरुने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. धरणगावमध्ये एका नराधम शिक्षकाने आपल्याच विद्यार्थिनीवर तब्बल ३ वर्षे अत्याचार केले. पण अखेर या नराधमाचं पाप उघड झालं असून, पीडितेने आणि तिच्या नातेवाईकांनी त्याला भररस्त्यात बेदम चोप दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी शिक्षक राहुल अहिरे याने विद्यार्थिनीसोबत गोड बोलून सुरुवातीला मैत्री केली होती. त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करत फोटो काढले आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार संबंधांची मागणी केली. हा प्रकार 2022 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत सुरू असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, संतप्त विद्यार्थिनी आणि तिच्या नातेवाईकांनी संबंधित शिक्षकाला लाथा-बुक्क्या आणि काठीने बेदम चोप दिला आहे. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.