पुणे कस्टमचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!; संत्र्याच्या पेट्या उघडल्या अन् अधिकारीही चक्रावले

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने ड्रग्ज तस्करीचा एक मोठा डाव उधळून लावला आहे. थायलंडहून चक्क ‘मँडरिन ऑरेंज’च्या बॉक्समध्ये लपवून आणलेला तब्बल ७६ किलो ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त करण्यात आला.आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत २६.८० कोटी रुपये असून, अत्यंत चलाखीने व्हॅक्यूम सीलबंद पाकिटांत हे ड्रग्ज दडवले होते. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

ही संपूर्ण खेळी अगदी स्मार्ट पद्धतीने आखली गेली होती. माल संत्र्याच्या फोडी असल्याचं सांगून थर्माकोलच्या बॉक्समध्ये पॅक करून आणण्यात आला होता. बाहेरून सगळं अगदी नॉर्मल दिसत होतं, त्यामुळे सुरुवातीला कोणालाही संशय येणं कठीण होतं. पण स्कॅनिंग करताना अधिकाऱ्यांना काहीतरी गडबड असल्याचा अंदाज आला.यानंतर त्यांनी एक बॉक्स उघडून पाहिला आणि खरी गोष्ट समोर आली. आत सीलबंद टिनचे डबे ठेवलेले होते. सुरुवातीला त्या डब्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर दिसत होती. मात्र, नीट तपासणी केल्यानंतर लक्षात आलं की ही पावडर फक्त वरवरची होती. त्या पावडरच्या आत व्हॅक्यूम सीलबंद प्लास्टिक पॅकेट्समध्ये गांजा लपवून ठेवण्यात आला होता.यानंतर सगळे बॉक्स तपासले असता एकूण ७६.५८ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात या मालाची किंमत जवळपास २६.८० कोटी रुपये असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

या प्रकरणी सीमाशुल्क विभागाने तातडीने कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. हा माल नेमका कोणासाठी आणला जात होता, आणि यामागे कोणतं मोठं रॅकेट आहे का, याचा आता सखोल तपास सुरू आहे.