
गेल्या दोन दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांत दोन्ही शहरांमध्ये एकूण १५ लोकांचा मृत्यू झाला असून, यातील ११ जणांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर उर्वरित ४ जणांचा मृत्यू इतर वेगवेगळ्या कारणांमुळे झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तोंडातून फेस, चक्कर अन् हृदयविकाराचा झटका

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंतच्या नागरिकांचा समावेश आहे. दारू पिऊन घरी आल्यानंतर काही वेळातच या नागरिकांना त्रास सुरू झाला. काही जणांच्या तोंडातून फेस आला, काही जण चक्कर येऊन थेट बाथरूममध्ये कोसळले, तर काही जणांचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. या दारूकांडात दोन सख्ख्या भावांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक माहिती समोर आली आहे.
फुगेवाडी आणि हडपसरमध्ये नेमकं काय घडलं?
पुणे-मुंबई महामार्गावरील फुगेवाडी भागात एकाच दिवशी ८ जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासन हादरले. तपास केला असता त्यातील ६ जणांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले.
हडपसर भागात गावठी दारू प्यायल्यानंतर अनेक नागरिकांना उलट्या आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान ५ जणांचा मृत्यू झाला.
मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात, ‘केमिकलयुक्त स्पिरिट’मुळे घात!
या भीषण दारूकांडप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. योगेश वानखेडे नावाच्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
तपासातील महत्त्वाचा खुलासा
आरोपी योगेश वानखेडे यानेच पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी आणि पुण्याच्या हडपसर भागात ‘केमिकलयुक्त स्पिरिट’चा पुरवठा केला होता. याच जीवघेण्या स्पिरिटपासून घातक हातभट्टीची दारू तयार करण्यात आली होती, जी प्यायल्याने ११ जणांचा बळी गेला.
पोलीस प्रशासनाची माहिती आणि पुढील कारवाई
पुणे पोलीस उपायुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची अधिकृत माहिती दिली आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, अहवाल आल्यानंतर अधिक बाबी स्पष्ट होतील. आरोपी स्वतः पोलिसांसमोर हजर झाला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का, याचा सखोल तपास पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत.










