चुलत आजोबांवर नातवाकडून गोळीबार; परिसरात खळबळ

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून एक खळबळजनक आणि थरारक घटना समोर आली आहे. येथे कौटुंबिक वादातून एका नातवाने आपल्याच ६५ वर्षीय सख्ख्या चुलत आजोबांवर दिवसाढवळ्या गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या जीवघेण्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाले आहेत.

दगडू कोहकडे (वय ६५) असे या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या अहिल्यानगर येथील एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राहुरी परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

गाड्या पेटवल्या, हाणामारी झाली; अन् शेवटी थेट गोळीबार!

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी प्रवीण कोहकडे आणि त्याचे चुलत आजोबा दगडू कोहकडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. हा वाद दिवसेंदिवस वाढतच गेला. या वादाचे रूपांतर आधी एकमेकांना मारहाण करण्यात झाले होते. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी संतापलेल्या आरोपी प्रवीणने गाड्या पेटवून दिल्याचाही भयंकर प्रकार घडला होता. या दोन्ही घटनांसंदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात आधीच गुन्हे दाखल आहेत.

छातीत घुसली गोळी, वृद्ध रक्ताच्या थारोळ्यात

राहुरी पोलिसात गुन्हे दाखल झाल्याने आरोपीच्या मनात जुना राग धुमसत होता. हाच राग मनात धरून आरोपी प्रवीण कोहकडे याने शुक्रवारी दगडू कोहकडे यांना एकटे गाठले. काही समजण्याच्या आतच प्रवीणने बंदूक काढून त्यांच्यावर थेट गोळी झाडली. आरोपीने केलेल्या गोळीबारात एक गोळी दगडू कोहकडे यांच्या थेट छातीत घुसली. गोळी लागताच वृद्ध रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळले.

स्थानिकांची धाव, प्रकृती चिंताजनक

गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांना येताना पाहून आरोपीने तेथून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या दगडू कोहकडे यांना स्थानिकांनी रक्ताच्या थारोळ्यातून उचलून तत्काळ उपचारासाठी अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते आहे.

आरोपी फरार, पोलिसांची पथके रवाना

या घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, गोळीबार केल्यानंतर आरोपी प्रवीण कोहकडे हा फरार झाला आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी विविध पथके रवाना केली असून, राहुरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.