कौटुंबिक वादातून आजीची हत्या करून मृतदेह आंबेनळी घाटात फेकला; अलिबाग पोलिसांकडून नातवाला बेड्या

महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणारा आंबेनळी घाट पुन्हा एकदा एका गंभीर गुन्हेगारी घटनेमुळे हादरला आहे. पोलादपूर तालुक्याच्या हद्दीतील बावली टोक ते दाभिल टोक दरम्यानच्या खोल दरीमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांसमोर धक्कादायक माहिती आली असून, अलिबाग येथील एका युवकाने स्वतःच्या सख्ख्या आजीची हत्या करून तिचा मृतदेह घाटातील दरीत फेकल्याचे उघड झाले आहे.

कौटुंबिक वादातून आजीचा गेम

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नराधम नातवाने दोन दिवसांपूर्वी कौटुंबिक कारणातून किंवा अन्य वादातून आपल्या आजीचा खून केला. खून केल्यानंतर हा गुन्हा कोणाच्याही लक्षात येऊ नये आणि पुरावा नष्ट व्हावा, या उद्देशाने त्याने आजीचा मृतदेह गाडीत टाकून आंबेनळी घाटातील दुर्गम आणि खोल दरीत नेऊन फेकून दिला.

ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह दरीतून बाहेर

दुर्गम भागात खोल दरीत मृतदेह असल्याने सुरुवातीला पोलिसांसमोर त्याची ओळख पटवणे आणि मृतदेह बाहेर काढण्याचे मोठे आव्हान होते. यावेळी ‘प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम’ तसेच ‘महाबळेश्वर ट्रेकर्स’च्या जवानांनी अत्यंत धाडसी मोहीम राबवली. जीवाची पर्वा न करता जवानांनी खोल दरीत उतरून वृद्धेचा मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढला.

आरोपी नातवाने दाखवले घटनास्थळ!

अलिबाग पोलिसांनी या प्रकरणात संशयाच्या आधारे संबंधित नातवाला ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. इतकेच नव्हे तर, आजीचा मृतदेह नेमका कोणत्या ठिकाणी फेकला होता, ते ठिकाणही त्याने पोलिसांना दाखवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

आंबेनळी घाट गुन्हेगारांचा अड्डा बनतोय?

काही दिवसांपूर्वीच या घाटात एका भीषण अपघातात ८ युवकांचा मृत्यू झाला होता, ज्याची जखम अद्याप ताजी आहे. त्यातच आता हे निर्घृण हत्याप्रकरण समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही आंबेनळी घाटातील याच परिसरात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यामुळे हा घाट पुन्हा एकदा गूढ आणि गंभीर गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आला आहे.या हत्येमागील नेमके कारण काय? या गुन्ह्यात नातवाला आणखी कोणी मदत केली होती का? याचा सखोल तपास सध्या अलिबाग पोलीस करत आहेत.