
सध्या सर्वत्र घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. अशातच गॅस कसा मिळणार या चिंतेत सामान्य जनता असताना, पुण्याच्या इंदापूर आणि दौंड तालुक्याच्या सीमेवरून एक अतिशय अजब आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वीच गॅस एजन्सीमधून आणलेला सिलिंडर अचानक संपल्याने ग्राहकाने जेव्हा टाकीची तपासणी केली, तेव्हा त्या सिलिंडरमध्ये गॅसऐवजी अर्ध्यापेक्षा जास्त पाणी असल्याचा खळबळजनक दावा ग्राहकाने केला आहे.

दोन दिवसांत गॅस संपला कसा?

दौंड तालुक्यातील राजेगाव येथील रहिवासी गणेश गोसावी यांच्या आई रतन गोसावी यांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील ‘अंजली इण्डेन गॅस’ या वितरण केंद्रामधून घरगुती वापराचा सिलेंडर खरेदी केला होता. घरी आणून हा सिलिंडर जोडल्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांतच गॅस संपला. ‘काल-परवा आणलेला सिलिंडर इतक्या लवकर कसा संपला?’ यावरून माय-लेकात चर्चा सुरू झाली. अखेर आईने दिलेल्या सल्ल्यानुसार गणेश यांनी टाकी हलवून पाहिली.
मोटरसायकलच्या चावीने वाल्व्ह दाबला अन्…
टाकी हलवल्यानंतर आतमध्ये मोठ्या प्रमाणावर द्रव पदार्थ असल्याचा आवाज येत होता. जर आतमध्ये गॅस आहे, तर मग शेगडी का जळत नाही? हा प्रश्न पडल्याने गणेश गोसावी यांनी मोटरसायकलच्या चावीने सिलिंडरचा वाल्व्ह दाबून पाहिला. त्यावेळी गॅसऐवजी त्यातून चक्क पाण्याचे कारंजे बाहेर आले! हा प्रकार पाहून गोसावी कुटुंबीय चक्रावून गेले.
एजन्सीचे अजब उत्तर; “जेवढं पाणी असेल, तेवढा गॅस देऊ!”
दुसऱ्या दिवशी गणेश गोसावी यांनी हा संपूर्ण प्रकार गॅस वितरण केंद्राच्या व्यवस्थापनाला (एजन्सी) सांगितला. त्यावर एजन्सीने “तुम्ही सिलिंडर घेऊन या, टाकीमध्ये जेवढे पाणी निघेल तेवढा गॅस तुम्हाला भरून देऊ,” असे अजब उत्तर दिल्याची माहिती गोसावी यांनी दिली. मात्र, या उत्तरामुळे ग्राहकाचे समाधान झाले नसून त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला आहे.
१२ किलोमीटरची पायपीट आणि मनस्ताप
या संपूर्ण प्रक्रियेत गोसावी यांना मोठा मनस्ताप झाला आहे. त्यांना गॅसची होम डिलिव्हरी मिळत नाही. गॅस हवा असल्यास आधी १२ किलोमीटर दूर असलेल्या भिगवण येथील केंद्रात जाऊन नोंद करावी लागते आणि तिथून पुन्हा गोडाऊनला जाऊन गॅस खरेदी करावा लागतो. इतकी पायपीट करूनही जर सिलिंडरमध्ये पाणी निघत असेल, तर सामान्य ग्राहकांनी काय करायचे? असा संतप्त प्रश्न गोसावी यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित गॅस एजन्सीवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.










