
समलैंगिक संबंध आणि लग्नास दिलेल्या नकारातून एका तरुणाने आपल्याच मित्राची चालत्या गाडीत धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आली आहे. आरोपीने अत्यंत क्रूरतेने मित्राचा गळा चिरून त्याचा जीव घेतला. हत्या करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

या खळबळजनक हत्याकांडामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सूरज हलदार याला अटक केली असून, सतीशकुमार निसाद असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सतीशकुमार निसाद हा अहेरी जवळील नागेपल्ली येथील रहिवासी असून त्याचा गॅरेजचा व्यवसाय होता. तर आरोपी सूरज हलदार हा ओडिशा राज्यातील नबरंगपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी या दोघांची ‘इन्स्टाग्राम’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर आधी मैत्रीत आणि नंतर समलैंगिक प्रेमसंबंधांत झाले.
दरम्यान, सतीशकुमार हा आधीच विवाहित असल्याची माहिती जेव्हा आरोपी सूरजला समजली, तेव्हापासून या दोघांमध्ये सातत्याने खटके उडू लागले होते. सूरजला सतीशकुमारसोबत लग्न करायचे होते, मात्र सतीशकुमारने त्याला नकार दिला होता.
आरोपी सूरज हलदार हा दोन दिवसांपूर्वीच सतीशकुमारला भेटण्यासाठी ओडिशाहून नागेपल्ली येथे आला होता. रविवारी पहाटेच्या सुमारास सतीशकुमार हा आरोपी सूरजला परत ओडिशामध्ये सोडण्यासाठी आपल्या चारचाकी गाडीने निघाला होता.
दोघांचा प्रवास सुरू असताना एटापल्ली तालुक्यातील देवदा गावाजवळ गाडी पोहोचली. यावेळी गाडीतच पुन्हा एकदा लग्न आणि विवाहबाह्य संबंधांच्या कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, प्रचंड संतापलेल्या सूरजने आपल्यासोबत आणलेला धारदार चाकू काढला आणि सतीशकुमारवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने अत्यंत क्रूरतेने सतीशकुमारचा गळा चिरून त्याला गाडीतच संपवले.
सतीशकुमार रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी सूरज हलदार मृतदेह गाडीतच सोडून घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पहाटेच्या वेळी त्याचा संशयास्पद वावर पाहून स्थानिक नागरिकांना संशय आला. गावकऱ्यांनी तातडीने धाव घेत त्याला जागीच पकडले आणि गाडीत पाहिले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.










