
मावळ तालुक्यातील पवनानगर परिसरात एका तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह दुचाकीसह जाळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २८) उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास वेगाने करत पोलिसांनी अवघ्या तीन ते चार तासांत दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आठवडाभरात घडलेली ही तिसरी हत्या असल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

अधिकच्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव अमोल अनंता मोहोळ (वय ३७, रा. वारू, ता. मावळ) आहे. या खून प्रकरणातील आरोपी भरत काशिनाथ वाल्हेकर आणि सुनील भिमा पवार (दोघेही रा. पवनानगर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने हालचाल केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. मोबाईल कॉल रेकॉर्ड विश्लेषण, घटनास्थळाचा पंचनामा, तांत्रिक पुरावे आणि हालचालींचा मागोवा यामुळे अल्पावधीतच आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात वैयक्तिक वादातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. फॉरेन्सिक तपास आणि पुढील चौकशी सुरू असून अधिक तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
महागाव-धालेवाडी रस्त्यालगत असलेल्या शेतात सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिकांनी संशय आल्याने पोलिसांना माहिती दिली. मृतदेहाजवळच जळालेली दुचाकी सापडली. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह आणि वाहन जाळण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.










