‘मुलगी सारखी पळून जायची म्हणून रागात खुनाची खोटी कबुली दिली’; सुटकेनंतर वडिलांचा खुलासा, मग तो शिरविरहित मृतदेह कोणाचा?

एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटालाही मागे टाकेल अशी एक अत्यंत धक्कादायक आणि पोलिसांना चक्रावून टाकणारी घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात काही दिवसांपूर्वी एक शिरविरहित आणि अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. या प्रकरणी ज्या तरुणीची हत्या झाली समजून तिच्या वडिलांना आणि भावाला पोलिसांनी अटक केली होती, तीच तरुणी अचानक जिवंतपणे पोलीस ठाण्यात हजर झाली आहे.
तरुणीला जिवंत पाहून पोलिसांचे धाबे दणाणले असून, या संपूर्ण प्रकारामुळे आता पोलिसांच्या घाईघाईने केलेल्या तपासावर आणि कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी राजुरा शिवारात दोन तुकड्यांमध्ये विभागलेला आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. प्राथमिक संशयावरून पोलिसांनी हा मृतदेह ‘शिवानी’ नावाच्या तरुणीचा असावा असा कयास बांधला. याच संशयाच्या आधारे जळगाव जामोद पोलिसांनी शिवानीचे वडील बापूराम कलमेकर आणि तिच्या भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक केली.

मृत्यूचे ‘ते’ गुढ आणि शिवानीची एन्ट्री!

पोलिसांनी शिवानीचा मृतदेह समजून त्या अज्ञात मृतदेहावर अंत्यसंस्कारही उरकून घेतले होते. मात्र, या प्रकरणाला तेव्हा एक मोठा धक्का बसला, जेव्हा खुद्द शिवानीच जिवंतपणे पोलिसांसमोर हजर झाली. तिने आपण जिवंत असल्याचे सांगत आपल्या वडिलांची आणि भावाची सुटका करण्याची मागणी केली. यानंतर पोलिसांनी घडलेला सर्व प्रकार न्यायालयासमोर सादर केला आणि न्यायालयाने पिता-पुत्राची तात्काळ सुटका केली.

वडिलांनी खुनाची खोटी कबुली का दिली?

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर शिवानीचे वडील बापूराम कलमेकर यांनी केलेला खुलासा अधिक धक्कादायक आहे. ते म्हणाले, “माझी मुलगी वारंवार घरातून पळून जात असे, ज्यामुळे आम्हाला समाजात प्रचंड मानसिक त्रास आणि नैराश्य आले होते. याच रागाच्या भरात आणि त्रासाला कंटाळून आम्ही पोलिसांसमोर मुलीची हत्या केल्याची खोटी कबुली दिली. प्रत्यक्षात आम्ही असे काहीही केले नव्हते आणि पोलिसांनी आमच्यावर कोणतीही सक्ती केली नव्हती.”

तांत्रिक तपासाला बगल? पोलिसांची घाई नडली!

या संपूर्ण प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) तपासातील ढिसाळपणा समोर आला आहे. कोणत्याही प्रकारची शास्त्रीय ओळख, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स, डीएनए (DNA) चाचणी किंवा फॉरेन्सिक अहवाल न घेता, केवळ संशयावरून आणि आरोपींच्या कबुलीवरून पोलिसांनी थेट ‘हत्याकांड उघडकीस’ आणल्याचा दावा केला होता. प्राथमिक पुराव्यांची पडताळणी न करता केलेली ही घाई आता पोलिसांच्या चांगलीच अंगलट आली आहे.

आता पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान: ‘ती’ महिला कोण?

शिवानी जिवंत परतल्यामुळे कलमेकर कुटुंबीय निर्दोष सुटले असले, तरी आता पोलिसांसमोर यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.जर शिवानी जिवंत आहे, तर मग जंगलात सापडलेला आणि पोलिसांनी अंत्यसंस्कार केलेला ‘तो’ शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता? तिची हत्या कोणी आणि का केली? या गंभीर प्रकरणाचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी आता ४ विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके आता विविध जिल्ह्यांतील बेपत्ता महिलांची माहिती गोळा करणे, डीएनए अहवाल तपासणे आणि तांत्रिक विश्लेषण करून त्या अज्ञात महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.