फेक वेबसाईट आणि आकर्षक फोटो… लोणावळ्यातील व्हिला बुकींचा पर्दाफाश

निसर्गाचा अनमोल ठेवा लाभलेल्या लोणावळ्यात सहलीचा प्लॅन करताय? सावधान! सोशल मीडियावर आकर्षक फोटोंना भुलून व्हिला बुक करणे तुम्हाला महागात पडू शकते. सध्या लोणावळ्यात पर्यटकांची फसवणूक करणारा एक मोठा ‘ऑनलाईन व्हिला बुकिंग स्कॅम’ उघडकीस आला असून, मुंबईतील एका पर्यटकाला हजारोंचा फटका बसला आहे.

थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. याच गर्दीचा फायदा घेत ऑनलाईन भामट्यांनी आता नवीन जाळं विणलं आहे. मुंबईतील एका पर्यटकाने सहलीसाठी ऑनलाईन व्हिला शोधला. भामट्यांनी अतिशय सुंदर आणि आकर्षक व्हिलाचे फोटो पाठवून पर्यटकाचा विश्वास संपादन केला. बुकिंगसाठी पर्यटकाकडून २० ते २५ हजार रुपयांची आगाऊ रक्कम उकळली.

धक्कादायक बाब म्हणजे, पर्यटकाचा विश्वास बसावा म्हणून या भामट्यांनी व्हिलाचे लाईव्ह लोकेशन देखील पाठवले. मात्र, जेव्हा हा पर्यटक प्रत्यक्ष लोणावळ्यात त्या पत्त्यावर पोहोचला, तेव्हा तिथे कोणताही बंगला किंवा व्हिला अस्तित्वात नसल्याचे पाहून त्याचे धाबे दणाणले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पर्यटकाने संताप व्यक्त केला आहे.

कसा रचला जातोय ‘फसवणुकीचा सापळा’?

आकर्षक फोटो: फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलिशान बंगल्यांचे खोटे फोटो अपलोड केले जातात.

कमी किंमत: मार्केट रेटपेक्षा कमी किमतीत व्हिला देण्याचे आमिष दाखवले जाते.

फेक लोकेशन: गुगल मॅपवर चुकीची लोकेशन टॅग करून पर्यटकांची दिशाभूल केली जाते.

तात्काळ पेमेंटचा तगादा: “व्हिला हातातून जाईल” असे सांगून तातडीने ऑनलाइन पैसे भरण्यास भाग पाडले जाते.

स्थानिक व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण

या वाढत्या स्कॅममुळे लोणावळ्यातील अधिकृत हॉटेल आणि व्हिला व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्थानिक व्यावसायिकांच्या मते, हे भामटे लोणावळ्यातील नसून बाहेरून हे रॅकेट चालवत आहेत. यामुळे लोणावळ्याच्या पर्यटन व्यवसायावर आणि प्रतिमेवर वाईट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.