येडेश्वरी देवी मंदिर परिसरात भाविकांना मारहाण अन् लुटमार; अवैध पार्किंग चालकांचा उच्छाद

धाराशिव राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री येडेश्वरी देवी मंदिर परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरात अवैध पार्किंगच्या वादातून दर्शनासाठी आलेल्या भाविक दाम्पत्याला काही गुंडांनी बेदम मारहाण केली आहे. इतकेच नव्हे तर मारहाणीच्या गोंधळात महिला भाविकाचे दागिनेही हिसकावून घेण्यात आले आहेत. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बीडच्या कीर्तनकार दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, कडा (ता. आष्टी, जि. बीड) येथील ह.भ.प. परमेश्वर केरुळकर आणि त्यांच्या पत्नी अधिक मासानिमित्त श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आले होते. भक्तीभावाने दर्शनासाठी आलेल्या या केरुळकर दाम्पत्याला मंदिर परिसरात अत्यंत भयानक अनुभवाला सामोरे जावे लागले. केरुळकर दाम्पत्य मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरून तिथे उपस्थित असलेल्या काही अवैध पार्किंग वसुली करणाऱ्यांशी त्यांचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, ४ ते ५ जणांच्या टोळक्याने केरुळकर दाम्पत्यावर थेट हल्ला चढवला. या हल्ल्यात परमेश्वर केरुळकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली आहे. जखमी दाम्पत्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मारहाण करत सोन्याचे दागिने लांबवले!

हा प्रकार केवळ मारहाणीपुरता मर्यादित राहिला नाही. मारहाणीदरम्यान झालेल्या प्रचंड गोंधळाचा फायदा घेत, या गुंडांनी परमेश्वर केरुळकर यांच्या पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही हिसकावून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भरदिवसा महिला भाविकाची अशी लूट झाल्याने इतर भाविकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

येडेश्वरी देवी मंदिर परिसरातील अवैध पार्किंगचा आणि तिथल्या गुंडगिरीचा प्रश्न अत्यंत जुना असून तो या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, एवढी गंभीर घटना घडूनही पोलिसांनी अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप होत असल्याने, पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.