
बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. तालुक्याती रामनगर मुंडे वस्ती येथे पैशांच्या देवाण-घेवाणीवरून आणि अनैतिक संबंधांच्या वादातून एका नराधम चुलत दिराने आपल्याच वहिनीवर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या क्रूर हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर सपासप वार करण्यात आले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे, वहिनीला रक्ताच्या थारोळ्यात पाडल्यानंतर आरोपी दिरानेही स्वतः विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या दुहेरी घटनेमुळे संपूर्ण वडवणी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.जमुनाबाई असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडित महिलेचे नाव आहे.

महिला घरात एकटी असताना साधला डाव!
मिळालेल्या माहितीनुसार, ही थरारक घटना २९ मे रोजी घडली. पीडित जमुनाबाई या आपल्या घरात एकट्याच होत्या. हीच संधी साधून आरोपी चुलत दीर त्यांच्या घरात घुसला. तिथे आल्यानंतर दोघांमध्ये पैशांच्या कारणावरून आणि पूर्ववैमनस्यातून जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतप्त झालेल्या आरोपीने आपल्यासोबत आणलेला धारदार कोयता काढला आणि जमुनाबाई यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली.
शेजाऱ्यांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण!
आरोपीने केलेल्या या भीषण हल्ल्यात जमुनाबाई यांच्या शरीरावर खोलवर गंभीर जखमा झाल्या आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळल्या. त्यांचा ओरडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज ऐकून परिसरातील शेजाऱ्यांनी तातडीने मुंडे वस्तीवरील त्यांच्या घराकडे धाव घेतली. शेजाऱ्यांना पाहताच आरोपीने तिथून पळ काढला. शेजाऱ्यांनी वेळ न घालवता गंभीर जखमी जमुनाबाई यांना तातडीने बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यामुळे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील तातडीच्या उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
हल्लेखोर दिराचाही आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस देखरेखीखाली उपचार
पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी दीर आणि पीडित महिला जमुनाबाई यांच्यात पैशांच्या वादासोबतच अनैतिक संबंधही होते आणि याच कारणातून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. वहिनीवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपीला आपल्या कृत्याची जाणीव झाली किंवा अटकेच्या भीतीने त्याने स्वतः देखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
विष प्यायल्यामुळे आरोपीचीही प्रकृती खालावली असून, सध्या त्याच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात पोलिसांच्या कडक देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या घटनेचा पुढील सखोल तपास करत आहेत.










