
महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आणि संतांचा देश म्हणून ओळखला जातो. राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदाही लागू आहे. मात्र, तरीही समाजातील अंधश्रद्धेचं मूळ उपटून टाकण्यात यश आलेलं नाही, हेच दाखवणारी एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना नाशिक जिल्ह्यातील सटाण्यातून समोर आली आहे.

सटाण्यातील जुन्या अमरधाम स्मशानभूमीत मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी एका अर्धनग्न मांत्रिकाला सोबत घेऊन ‘अघोरी पूजा’ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास काही संशयित व्यक्ती अत्यंत महागड्या, आलिशान वाहनांमधून जुन्या अमरधाम परिसरात दाखल झाले. सुरुवातीला कोणालाही त्यांच्यावर संशय आला नाही. मात्र, त्यांच्यासोबत भगवे वस्त्र परिधान केलेला एक अर्धनग्न मांत्रिकही होता. या सर्वांनी थेट स्मशानभूमी गाठली आणि चितास्थळाजवळ जाऊन तांत्रिक विधी आणि अघोरी पूजा सुरू केली.
या अघोरी पूजेसाठी मोठ्या प्रमाणावर तांत्रिक साहित्याचा वापर करण्यात आला. सकाळी घटनास्थळाची पाहणी केली असता, तिथे अंडी आणि लिंबू उडीद आणि कवड्या, कापूर, फुले आणि नारळ साहित्य आढळून आले. विशेष म्हणजे, ही अघोरी पूजा आटोपल्यानंतर हे सर्व साहित्य तिथेच टाकून देण्यात आले. तसेच, पूजा संपवून निघताना हे संशयित घटनास्थळावरून काही संशयास्पद वस्तू स्वतःसोबत घेऊन गेल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.
हा सर्व अघोरी प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. “राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा केवळ नावापुरताच उरला आहे का? अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना कायद्याचा धाक का नाही?” असा सवाल आता सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
या गंभीर प्रकरणानंतर स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिसांनी अमरधाम परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तातडीने सखोल चौकशी करावी, संशयितांची ओळख पटवून त्यांच्यावर ‘जादूटोणा प्रतिबंधक कायद्या’अंतर्गत कठोर गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.आता या प्रकरणात नाशिक पोलीस किती वेगाने कारवाई करतात आणि या अघोरी पूजेमागचा मुख्य सूत्रधार कोण आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.










