
पुण्यातील कोंढवा परिसराची तुलना चक्क पाकिस्तानमधील ‘कराची’ शहराशी केल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी भाजप युवा मोर्चाचे पुणे शहर खजिनदार सर्वेश मेहंदळे यांच्या विरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

भाजप पदाधिकारी सर्वेश मेहंदळे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओची सुरुवातच त्यांनी अत्यंत वादग्रस्त विधानाने केली होती.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरताच त्याचे तीव्र पडसाद उमटले. कोंढव्याला पाकिस्तान म्हणणे हा या भागातील नागरिकांचा आणि पुणेकरांचा अपमान असल्याचे सांगत स्थानिक कार्यकर्त्यांनी कोंढवा पोलीस स्टेशनबाहेर मोठी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत मेहंदळे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी लावून धरली.
नागरिकांचा वाढता रोष आणि शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन कोंढवा पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली.पुण्यासारख्या शहरात एखाद्या भागाची तुलना थेट शत्रू राष्ट्रातील शहरांशी केल्याने राजकीय वर्तुळातूनही टीकेची झोड उठत आहे. पोलिसांनी सध्या नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे.










