भावाचा मित्र आणि नात्यातला काकाने चिमुकलीसोबत केलं भयंकर कृत्य

जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच भावाच्या मित्राने आणि नात्याने चुलत काका लागणाऱ्या नराधमाने अत्याचार केला आहे.

आरोपीनं केवळ अत्याचारच केला नाही, तर त्याने पीडित मुलीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेय. याप्रकरणी पीडितेनं चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेनं शहरात एकच खळबळ उडालीआहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हा पीडित मुलीच्या भावाचा मित्र असल्याने त्याचं पीडितेच्या घरी सतत येणं-जाणं होतं. या ओळखीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने मुलीला मैत्री करण्यास भाग पाडलं. यादरम्यान त्याने पीडितेसोबत काही फोटो काढले होते. या फोटोंचा वापर करून आरोपीने तिचा छळ सुरू केला. ‘हे फोटो व्हायरल करेल,” अशी धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केलाय.

दरम्यान, आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने अत्याचाराचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो काढून पीडितेला ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले. काही दिवसांपूर्वी या नराधमाने पीडितेचे हे खासगी फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल केले. हा प्रकार उघडकीस येताच पीडितेच्या पायाखालची जमीन सरकली आणि या गंभीर प्रकारानंतर पीडित मुलीने कुटुंबीयांच्या मदतीने पोलीस ठाणे गाठले.