
मुंबईनजीक असणाऱ्या पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नानिवली गावात १ मे रोजी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. इथं मेहुण्याचा मृत्यू झाल्यानंतर भावोजीनं मृत्यूला कवटाळलं आहे. भावोजीनं झाडाला गळफास लावून आयुष्य संपवलं. एकाच कुटुंबातील दोघांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किराट पवार पाडा येथील रहिवासी वैभव संजय लहांगे (१५) आणि चहाडे सज्जनपाडा येथील नितीन काशिनाथ वरठा (२२) हे दोघे नानिवली गावात एका लग्नसमारंभासाठी गेले होते. वैभव हा नितीनचा मेहुणा आहे. १ मे रोजी पहाटे समारंभ आटोपून ते दुचाकीवरून घरी परतत असताना नानिवली बसस्टॉपजवळ त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकी अतिशय भरधाव वेगात असल्याचे दिसून आले आहे. वेगावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी प्रथम रस्त्याच्या कडेला असलेल्या सोलर लाईटच्या पोलला धडकली आणि त्यानंतर एका झाडावर जाऊन आदळली. या धडकेत वैभवच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
दुचाकी चालवणारा वैभव जागीच मृत झाल्याचे पाहून मागे बसलेला नितीन प्रचंड मानसिक धक्क्यात गेला. मेहुण्याचा असा अंत पाहून त्याने टोकाचं पाऊल उचललं. घटनेनंतर काही वेळातच नितीनने जवळच्याच एका शेतात जाऊन आपल्या पँटच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.










