३ दिवसांपासून बेपत्ता तरुणीचा मृतदेह सिंहगडाच्या दरीत सापडला; सिंहगड किल्ल्याजवळ आढळली बॅग अन् इतर साहित्य

पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड किल्ल्याच्या परिसरातून बेपत्ता झालेल्या २८ वर्षीय तरुणीचा मृतदेह अखेर खोल दरीत आढळून आला आहे. मनीषा धर्मदास गायकवाड असे या तरुणीचे नाव असून, तिने बुरुजावरून उडी मारून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मूळची धनेगाव (जि. नांदेड) येथील रहिवासी असलेली आणि सध्या चिंचवडमधील बिजलीनगर येथे राहणारी मनीषा धर्मदास गायकवाड (वय २८) ही तरुणी २८ एप्रिल २०२६ पासून बेपत्ता होती. ती बेपत्ता झाल्यापासून कुटुंबीय तिचा शोध घेत होते. दरम्यान, सिंहगड किल्ल्याच्या परिसरात तिची बॅग, मोबाईल आणि इतर साहित्य बेवारस अवस्थेत आढळून आले. यामुळे घातपाताची किंवा अनुचित प्रकाराची शक्यता वर्तवण्यात येत होती. कुटुंबीयांनी तात्काळ हवेली पोलीस स्टेशनमध्ये ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

तरुणीचे साहित्य गडावर सापडल्याने शोधमोहीम तीव्र करण्यात आली. गडाच्या कड्यावरून खाली शोध घेणे अत्यंत कठीण होते. अखेर दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर, आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून दोराच्या साहाय्याने (रॅपलिंग) खोल दरीत उतरले. रात्रीच्या सुमारास खोल दरीमध्ये मनीषाचा मृतदेह आढळून आला.

आत्महत्येचा प्राथमिक अंदाज

मनीषाची बॅग आणि मोबाईल बुरुजाजवळ सापडल्याने, तिने तिथूनच उडी मारून आपले जीवन संपवले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, तिने हे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुढील तपास सुरू

हवेली पोलीस स्टेशनचे पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. नांदेडची ही तरुणी चिंचवडमध्ये काय करत होती आणि सिंहगडावर कधी व कशी पोहोचली, याचा शोध पोलीस घेत आहेत.