
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) राज्यपाल नियुक्त आमदार आणि सांगलीचे माजी महापौर इद्रीस नायकवाडी यांना पक्षाच्या युवा नेतृत्वाकडून राजीनामा मागण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दिवंगत नेते अजित पवार यांनी अल्पसंख्याक चेहरा म्हणून इद्रीस नायकवाडी यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती. मात्र, अजितदादांच्या निधनानंतर आता पक्षांतर्गत समीकरणे बदलताना दिसत असून, नायकवाडी यांच्या राजीनाम्याच्या चर्चेने पक्षात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या OSD कडून निरोप?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १५ दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ओएसडी यांनी आमदार इद्रीस नायकवाडी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, पक्षाच्या युवा नेतृत्वाच्या सूचनेनुसार त्यांना आमदारकीचा राजीनामा देण्याबाबत सांगण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. मात्र, नायकवाडी यांनी पक्षाच्या या सूचनेला स्पष्ट शब्दांत नकार देत “आपण राजीनामा देणार नाही,” अशी ठाम भूमिका घेतल्याचे समजते.
उद्या मुंबईत आमदारांची तातडीची बैठक; राजीनाम्याचा विषय गाजणार?
या सर्व पार्श्वभूमीवर, उद्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आमदार इद्रीस नायकवाडी यांच्या राजीनाम्याचा विषय अधिकृतपणे चर्चेला येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.










