
फुगेवाडी परिसरातील गावठी आणि विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणानंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकरणात कर्तव्यात कसूर आणि निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने दोन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण ६ जणांना तातडीने निलंबित केले आहे.पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी हे निलंबनाचे कडक आदेश जारी केले आहेत. या कारवाईमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तपासात निष्काळजीपणा उघड, आयुक्तांची थेट कारवाई

फुगेवाडी येथे विषारी दारू प्यायल्याने नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली होती. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षणात मोठी निष्काळजीपणा आणि गंभीर त्रुटी आढळून आल्या. याची दखल घेत पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली.
निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची नावे
निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये दापोडी पोलीस चौकीचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शोध पथकाच्या प्रमुखांचा समावेश आहे. यामध्ये विजय वाघमारे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दापोडी), राजू भास्कर (प्रमुख, गुन्हे शोध विभाग), पोलीस कर्मचारी जयदीप सोनावणे, नवनाथ पोते, सागर जाधव, विशाल काळे यांचा समावेश आहे.
कडक निर्बंध आणि विभागीय चौकशी सुरू
निलंबित करण्यात आलेल्या या सर्व अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू राहणार आहे. निलंबन कालावधीत त्यांच्यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत:सर्व निलंबित कर्मचाऱ्यांना दररोज पोलीस मुख्यालयात हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्यांच्या हक्काच्या रजांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.मुख्यालयाबाहेर जाण्याच्या त्यांच्या हालचालींवरही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
या धडक कारवाईमुळे अवैध दारू धंद्या पाठीशी घालणाऱ्या आणि कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उच्च अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे










