भोंदू खरात अडकणार ४ वर्ष जुन्या मृत्यूच्या जाळ्यात

शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे कर्मचारी विकास रामदास दिवटे यांचे आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजले होते. विकास दिवटे यांच्या या आत्महत्या प्रकरणाने आता एक वेगळे वळण घेतले आहे. विकास दिवटे यांच्या आत्महत्येप्रकरणी चार वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता याप्रकरणी संशयित म्हणून भोंदू बाबा अशोक खरातचे नाव असल्याचे समोर आले आहे. मात्र त्याचे नाव पोलीस तपासाच्या दोषारोपपत्रातून वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून सखोल फेरतपासाची मागणी होत आहे.

२०२२ मध्ये साई संस्थानमध्ये नोकरीस असलेल्या विकास दिवटे या तरुणाने मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली होती. विकास यांचा पत्नीसोबत घरगुती वाद सुरू होता. या वादाचा फायदा घेत सासरच्या मंडळींनी आणि कथित भोंदू बाबा अशोक खरात याने विकास यांना प्रचंड मानसिक छळ दिला, असा आरोप विकास दिवटे यांचे भाऊ राजेंद्र दिवटे यांनी केला होता.

यानतंर राजेंद्र दिवटे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, अशोक खरात याने विकास यांना त्यांच्या हक्काच्या नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली होती. तसेच वेळोवेळी जीवे मारण्याच्या धमक्या देऊन त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण केला होता. या सततच्या त्रासामुळेच विकास यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवले, मात्र आरोपपत्र दाखल करताना त्यातून अशोक खरातचे नाव वगळण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एका तरुणाला मृत्यूच्या दारात ढकलणाऱ्या मुख्य संशयिताचे नाव पुराव्याअभावी की अन्य दबावामुळे वगळले गेले, असा सवाल आता उपस्थित होत आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी या प्रकरणाचा पुन्हा एकदा वरिष्ठ पातळीवरून सखोल तपास करावा, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान अशोक खरातने दैवी शक्तीचा दावा करून अनेक लोकांची फसवणूक आणि महिलांचे शोषण केल्याचे आरोप समोर आले आहेत. पोलिसांनी या भोंदू बाबावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून, त्याच्या आश्रमातून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याचवरील पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. आता एसआयटीने दुसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा मिळवला आहे. यासाठी पोलिसांनी न्यायालयात विशेष अर्ज सादर केला होता. आता नव्या चौकशीत खरातच्या कॅश नेटवर्कमधील अन्य साथीदार आणि त्याला राजकीय किंवा प्रशासकीय अभय देणाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.