
ऑनलाइन सट्टा आणि जुगाराचे व्यसन माणसाला किती क्रूर बनवू शकते, याचा भयानक प्रत्यय बीडच्या माजलगाव तालुक्यात आला आहे. माजलगावमधील लहामेवाडी येथे एका निर्दयी पित्याने आपल्या दोन चिमुकल्या मुलींच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, उपस्थित लोकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या मुलींचे प्राण वाचले असून एक मोठा अनर्थ टळला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, महेश सोमासे नावाचा व्यक्ती २ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आपल्या सासरवाडीत म्हणजे लहामेवाडीत पोहोचला. त्याने आपली पत्नी अश्विनी हिला ‘नांदायला चल’ म्हणत धमकावण्यास सुरुवात केली. मात्र, पत्नीने सोबत जाण्यास नकार दिला. याचा राग अनावर झाल्याने महेशने स्वतःच्या पोटच्या दोन लहान मुलींच्या अंगावर सोबत आणलेले डिझेल ओतले आणि त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मुलींच्या आजी-आजोबांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ धाव घेऊन मुलींना बाजूला ओढले, ज्यामुळे या चिमुकलींचा जीव थोडक्यात वाचला.

सट्ट्यापायी ५ एकर जमीन फस्त
अश्विनी आणि महेश यांचा विवाह २०१९ मध्ये झाला होता. सुरुवातीची काही वर्षे सुखात गेल्यानंतर महेशला ऑनलाइन सट्ट्याचे भीषण व्यसन लागले. या नादात त्याने घराची ५ एकर शेती गमावली. एवढ्यावरच न थांबता, उरलेली सात एकर जमीन आपल्या नावावर करण्यासाठी तो पत्नीला माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावून मारहाण करत असे. याच छळाला कंटाळून अश्विनी आपल्या दोन मुलींसह माहेरी राहत होत्या.
या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट असून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या बापावर कडक कारवाईची मागणी होत आहे.










