
धार्मिक विधीच्या आडून महिलेला फसवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणात संशयित भोंदूबाबा अशोक खरात याला न्यायालयाने पुन्हा पोलिस कोठडी सुनावली आहे. जिल्हा न्यायालयाने त्याला ८ एप्रिलपर्यंत सात दिवसांची कोठडी दिली असून, यामुळे आधी कारागृहात रवानगी झालेल्या खरातची दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

दरम्यान, पोलिसांनी तपासादरम्यान काही संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. त्यामध्ये 22 रुद्राक्षांचा डबा, अंक व इंग्रजी अक्षरे असलेली पट्टी, काळ्या रंगाचे भिंग आणि हिरवट द्रव असलेली बाटली यांचा समावेश आहे. या वस्तूंचा वापर कथित अघोरी कृत्यांसाठी केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय, पीडितेकडून घेतलेल्या कागदपत्रांच्या आधारे आर्थिक व्यवहार करण्यात आले का, याचाही तपास सुरू आहे. विशेष तपास पथक या प्रकरणाच्या सर्व बाजूंनी चौकशी करत असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एसआयटीच्या तपासात अशोक खरातकडून होत असलेल्या फसवणुकीचे अनेक प्रकार बाहेर येत असून त्यामुळे अधिकारी देखील चक्रावले आहेत. मिरगाव (ता. सिन्नर) येथील एका कुटुंबाची १६ लाखांची जमीन अत्यंत कमी किमतीमध्ये घेण्यासाठी खरातने संबंधित कुटुंबाकडे तगादा लावला होता. अशोक खरातने कुटुंबाला भीती घातली, तुमची जमीन शापित असून ती न विकल्यास घरात कुटुंबात वाईट पटना पडेल, अशी भीती घातली. याच दरम्यान, कुटुंबातील एका तरुण मुलीचा मृत्यू देखील झाला. याचा गैरफायदा घेत खरातने, जमीन न विकल्यास घरातील आणखी दोघांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती दाखवत त्याला हवी असलेली शेतजमीन पत्नीच्या नावे करून घेतली. याच जमिनीवर अशोक खरातने ईशान्येश्वर महादेव मंदिराची उभारणी केल्याची बाब समोर आली आहे










