डिझेलचा टँकर पलटी होताच ग्रामस्थांची झुंबड; ड्रम, बादल्या घेऊन जे मिळेल त्यात भरले डिझेल!

एकीकडे इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधन दरवाढ आणि गॅसटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनाही डिझेलच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. अशा ऐन महागाईच्या आणि टंचाईच्या काळात वर्धा जिल्ह्यातून एक अजब आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यात डिझेलने भरलेला एक टँकर पलटी होताच, सांडलेले डिझेल गोळा करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. ज्याच्या हातात जे भांडे पडेल, ते घेऊन लोक डिझेल पळवण्यासाठी धावताना दिसले.

टायर फुटल्याने टँकर महामार्गाच्या कडेला उलटला

ही घटना वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील तरोडा ते बोथुडा दरम्यान घडली आहे. समुद्रपूरच्या दिशेने जात असलेल्या या डिझेल टँकरचा अचानक टायर फुटला. टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा टँकर महामार्गाच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पलटी झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही, परंतु टँकरमधील हजारो लीटर डिझेल शेतात आणि परिसरात सांडू लागले.

ड्रम, बॅरेल आणि बादल्या घेऊन गावकऱ्यांची धावपळ!

टँकर उलटल्याची बातमी वाऱ्यासारखी आजूबाजूच्या गावांमध्ये पसरली. देशात आधीच इंधनाची टंचाई आणि कडक सक्ती सुरू असताना, फुकटचे डिझेल मिळत असल्याचे पाहून गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.जवळील गावातील लोकांनी चक्क ड्रम, प्लास्टिकचे बॅरेल, कॅन आणि घरात मिळतील त्या बादल्या-भांडी घेऊन घटनास्थळ गाठले. टँकरमधून गळणारे आणि शेतात सांडलेले डिझेल आपापल्या डब्यात भरण्यासाठी लोकांची मोठी झुंबड उडाली होती. अनेक जण डिझेल गोळा करून घरी पळवताना दिसले.

पोलीस येताच ‘डिझेल चोरी’ थांबली

अपघाताची माहिती मिळताच हिंगणघाट पोलीस तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन गर्दीवर नियंत्रण मिळवले आणि लोकांना बाजूला केले. पोलीस आल्यानंतर गावकऱ्यांचे डिझेल पळवण्याचे काम बंद झाले. पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात रंगली आहे.