अन् लाटांच्या तडाख्यात क्रूझने घेतली जलसमाधी!

मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळावर मोठी दुर्घटना घडली आहे. नर्मदा नदीच्या बॅकवॉटरमध्ये पर्यटकांनी भरलेली क्रूझ अचानक बुडाली. दुर्घटनेवेळी क्रूझमध्ये जवळपास ३० प्रवासी होते.

जबलपूरमधील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या बरगी धरण परिसरात क्रूझला अपघात झाला. क्रूझ नर्मदा नदीच्या बॅकवॉटरमध्ये असताना वातावरण अचानक बिघडलं. सोसाट्याचा वारा सुटला. क्रूझ खोल भागात असताना लाटा उसळू लागल्या. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यानं दबाव निर्माण झाला. त्यामुळे क्रूझचं संतुलन बिघडलं. अवघ्या काही मिनिटांत क्रूझ पाण्यात बुडालं.

अपघात झाल्यानंतर स्थानिक नावाडी आणि प्रशासनानं तातडीनं बचाव कार्य सुरु केलं. आतापर्यंत १५ जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. त्यांना पाण्याबाहेर काढण्यात यश आलं आहे. मदत आणि बचाव पथकांनी आतापर्यंत ४ शव पाण्याबाहेर काढले आहेत. अजूनही बरेच जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. यासाठी पाणबुडे आणि एसडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आलं आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी बॅकवॉटर परिसरात पोहोचले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक आलेल्या वादळामुळे क्रझ चालकाला दुर्घटना टाळण्याची संधीच मिळाली नाही. क्रूझचं संतुलन बिघडल्यानं हा अपघात झाला.