वराह पालनाचा जुना वाद अन् भररस्त्यात कोयत्यानं वार

सोलापूर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. माधव नगर येथील मुख्य रस्त्यावर सुरेश कृष्णा श्रीराम (वय ४२) या तरुणाची दिवसाढवळ्या कोयता आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, आरोपींनी हत्येपूर्वी इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मयत सुरेश श्रीराम आणि आरोपींमध्ये गेल्या पाच वर्षांपासून वराह (डुक्कर) पालनाच्या व्यवसायावरून वाद सुरू होता. पाच वर्षांपूर्वी सुरेश यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता, ज्याची सुनावणी सध्या न्यायालयात सुरू आहे. हा जुना गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपी सुरेश यांच्यावर दबाव टाकत होते. मात्र, सुरेश यांनी तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांचा काटा काढण्याचे ठरवले.

इन्स्टाग्राम स्टेटस ठेवून केला ‘गेम’

आरोपींनी ही हत्या केवळ रागातून केली नाही, तर त्याचा सोशल मीडियावर गवगवा देखील केला. हत्येपूर्वी आणि हत्येनंतर आरोपी व त्यांच्या समर्थकांनी इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी भररस्त्यात लाठ्या-काठ्या, धारदार शस्त्रे आणि दगडांनी सुरेश यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्या तोंडावर दगडाने ठेचून त्यांना मृत्यूच्या दारात ढकलले गेले.

६ जणांवर गुन्हा दाखल, ५ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

मृताची पत्नी लक्ष्मी श्रीराम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोलापूरच्या जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बीएनएस कायद्याच्या विविध कलमांसह शस्त्र अधिनियमान्वये कारवाई केली आहे.

अटकेत असलेल्या आरोपींची नावे

विजय श्रीराम (मुख्य आरोपी)

रोहित रेड्डी

सुभाष सगडा

करण श्रीराम

सुमित श्रीराम

राहुल रेड्डी (तपास सुरू)

पोलिसांची कारवाई

पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवली आहेत. आतापर्यंत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले असून, आणखी एक संशयित आरोपी फरार आहे, ज्याचा पोलीस शोध घेत आहेत.