मुलाच्या मृत्यूनंतर सावत्र आईचीही रुग्णालयाच्या परिसरात गळफास घेऊन आत्महत्या

सावत्र आई आणि २१ वर्षीय मुलाच्या अनैतिक संबंधांचा अत्यंत धक्कादायक आणि थरारक शेवट झाल्याची घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. लोकनिंदा आणि बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. तर, आपल्या प्रियकराच्या (नात्याने सावत्र मुलगा) मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. या दुहेरी आत्महत्येच्या घटनेमुळे केज आणि अंबाजोगाई परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दोघे घरातून झाले होते पसार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील सोनी जवळा येथील एका व्यक्तीचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर चार वर्षांपूर्वी त्यांनी अनिता नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले होते. पहिल्या पत्नीचा मुलगा अनिल पवार (वय २१) हा देखील सोबतच राहत होता. मात्र, दरम्यानच्या काळात अनिल आणि त्याची सावत्र आई अनिता यांच्यात प्रेमसंबंध जुळले. हे अनैतिक संबंध लपवण्यासाठी काही दिवसांपूर्वी अनिल आणि अनिता हे दोघे घरातून थेट तेलंगणा राज्यात पळून गेले होते.

पोलिसांनी तेलंगणातून आणले परत

आपली पत्नी आणि मुलगा दोघेही एकदमच बेपत्ता झाल्याने हवालदिल झालेल्या पतीने केज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे थेट तेलंगणा गाठले. पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेऊन महाराष्ट्रात परत आणले.

बदनामीच्या भीतीने मुलाने घेतले विष

आपले अनैतिक संबंध आता कुटुंब आणि समाजासमोर उघड झाले आहेत, या प्रचंड भीतीपोटी आणि नैराश्यातून अनिल पवार याने विषारी औषध प्राशन केले. त्याची प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात (SRTR) दाखल केले. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही उपचार सुरू असतानाच अनिलचा मृत्यू झाला.

रुग्णालयाच्या आवारातच सावत्र आईचा गळफास

अनिलच्या मृत्यूची बातमी समजताच अनिताला हा विरह सहन झाला नाही. तिने याच नैराश्यातून स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय सभागृहाच्या पाठीमागे असलेल्या एका निर्जन जागी जाऊन, झाडाला गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली. रुग्णालयाच्या परिसरातच हा प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला.

पोलीस तपास सुरू

एकाच प्रेमसंबंधातून काही तासांच्या अंतराने माय-लेकाने टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण जिल्ह्यात या घटनेची चर्चा सुरू आहे. अंबाजोगाई आणि केज पोलीस या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असून, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.