
छत्रपती संभाजीनगरमधील विटावा शिवारात झालेल्या एका अज्ञात तरुणाच्या खुनाचा थरारक उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. हत्येनंतर इन्स्टाग्रामवर ‘टपका रे टपका’ गाण्यावर रील पोस्ट करणे आरोपींना चांगलेच महाग पडले आहे. सोशल मीडियाचा हाच धागा पकडत पोलिसांनी आरोपींना गजाआड केले. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या ५०० रुपयांच्या किरकोळ वादातून या तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे जीव घेण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

मृत आणि आरोपी दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

या थरारक हत्याकांडात ओंकार चंद्रकांत सूर्यवंशी (वय २२, रा. रामनगर सांगवी, नांदेड) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तातडीने कारवाई करत रवी देविदास दुधमल (वय १९, रा. नांदेड), सय्यद हाशिम सय्यद हसन (वय १८, रांजणगाव शेणपुंजी, ता. गंगापूर) यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. मृत ओंकार आणि त्याला संपवणारे आरोपी हे सगळेच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती समोर आली आहे.
१४ मे मध्यरात्री विटावा शिवार परिसरात ही घटना घडली. सुरुवातीला मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने पोलिसांनी केवळ अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.१८ मे रोजी पोलिसांचा संशय अधिक गडद झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर आलेल्या पोस्टमॉर्टम अहवालात तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याचे वैद्यकीयदृष्ट्या स्पष्ट झाले.
इन्स्टाग्राम रीलने दिला सुगावा
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले असता एक संशयित दुचाकी पोलिसांना दिसली. याच दरम्यान आरोपींनी खून केल्यानंतर इन्स्टाग्रामवर ‘टपका रे टपका’ या गाण्यावर एक रील आणि स्टोरी पोस्ट केली होती. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत या सोशल मीडिया अकाउंटवरून आरोपींची अचूक ओळख पटवली.
पोलिसांनी घेतला चक्क भाजी विक्रेत्याचा वेश!
आरोपींची ओळख पटल्यानंतर ते नांदेड परिसरात लपल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे एक विशेष पथक तातडीने नांदेडला रवाना झाले आणि सलग ३ ते ४ दिवस तेथे गुप्त पाळत ठेवली. आरोपींना संशय येऊ नये म्हणून काही पोलीस कर्मचाऱ्यांनी चक्क भाजी विक्रेत्याचा वेश परिधान केला होता. या अनोख्या वेशातील पोलिसांनी आरोपींची इत्थंभूत माहिती गोळा केली. तपासात असेही समोर आले की, यातील एक आरोपी आधीच जेलमधून पसार होऊन संभाजीनगरमध्ये गुन्हेगारी कृत्य करत होता.
राज्याबाहेरून परतताच आवळल्या आवळल्या मुसक्या
आरोपी परराज्यात फरार झाल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी राज्याबाहेरही शोधमोहीम राबवली होती. मात्र, आरोपी पुन्हा आपल्या परिसरात परतत असल्याची अचूक टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचून तिघांनाही बेड्या ठोकल्या. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच, अवघ्या ५०० रुपयांच्या किरकोळ देवाणघेवाणीच्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला करून ओंकारचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.










