
अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील भोंदूबाबा राजेंद्र बापू गडगे प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत 200 हून अधिक व्हिडिओ जप्त केले आहेत.

हे सर्व व्हिडिओ आता फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जाणार असून त्यातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय, दत्तधाम आश्रमातून 90 हून अधिक संशयास्पद औषधांचा साठा जप्त करण्यात आला असून त्या औषधांचे नमुनेही तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.

अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गडगे आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर संगमनेर, अहिल्यानगर, नेवासा आणि राहाता परिसरात तब्बल 13 मालमत्ता असल्याचे तपासात उघड झाले आहे. या मालमत्तांची माहिती मिळवण्यासाठी सब-रजिस्ट्रार कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच, गडगे याची 10 वेगवेगळ्या बँकांमधील खाती तपासाअंतर्गत असून आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू आहे.
गडगे हा कॅन्सरसारखे दुर्धर आजार मंत्रशक्तीने बरे करण्याचा दावा करत असे. तसेच ‘पुत्रप्राप्ती’सारख्या अंधश्रद्धांना खतपाणी घालत महिलांची आणि कुटुंबांची फसवणूक केल्याचे आरोप आहेत. या संदर्भात ग्रामीण रुग्णालयाकडून त्याला नोटीसही बजावण्यात आली आहे.
या प्रकरणी गडगेसह डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे, सूरज शिंदे आणि मधुकर शिंदे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी गडगे आणि मधुकर शिंदे सध्या पोलिस कोठडीत असून उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे. डॉ. मोहन पुरी हा औषध पुरवठ्याचा प्रमुख सूत्रधार असल्याचा संशय असून तो सध्या फरार आहे.










