कोरोनात साधं लग्न केलं, अतोनात छळ अन् शेवट करुण!

पैशांची हाव आणि ‘लग्नात बडेजाव केला नाही’ या क्षुल्लक कारणावरून एका विवाहितेला मृत्यूच्या दारात ढकलल्याची खळबळजनक घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे. राहाता तालुक्यातील प्रिया ढगे या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. लग्नानंतर सुखाचा संसार पाहण्याचे तिचे स्वप्न सासरच्यांच्या लालसेपायी धुळीस मिळाले आहे.

बँक अधिकारी पतीला हवा होता ‘बडेजाव’!
प्रियाचा विवाह १७ फेब्रुवारी २०२२ रोजी राहात्यातील शुभम ढगे याच्याशी झाला होता. शुभम एका राष्ट्रीयीकृत बँकेत मोठ्या पदावर नोकरीला आहे. कोरोना काळ असल्याने हे लग्न साध्या पद्धतीने पार पडले होते. मात्र, हेच साधेपण सासरच्यांच्या डोळ्यात खुपू लागले. “लग्न टोलेजंग आणि मौजमजेत केले नाही,” असे टोमणे मारून प्रियाचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला.

बांधकामासाठी ४ लाखांची मागणी अन् मारहाण
केवळ लग्नाच्या पद्धतीवरूनच नाही, तर घराच्या बांधकामासाठी माहेराहून ४ लाख रुपये घेऊन ये, यासाठीही प्रियावर दबाव टाकला जात होता. तिला वेळोवेळी शिवीगाळ करणे, उपाशी ठेवणे आणि अमानुष मारहाण करणे असे प्रकार सुरू होते. सुशिक्षित पती आणि सासरचे लोक इतके क्रूर वागू शकतात, याचे धक्कादायक वास्तव या घटनेने समोर आणले आहे.

मृत्यूपूर्वी पाठवला ‘तो’ व्हॉट्सअ‍ॅप मेसेज!
सासरचा छळ असह्य झाल्यानंतर प्रिया माहेरी एकरुखे येथे आली होती. मात्र, तिथेही तिच्या मनात तीच भीती आणि दुःख होतं. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी तिने आपल्या कुटुंबीयांना व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज पाठवला. यामध्ये तिने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या अतोनात त्रासाचा पाढा वाचला आणि त्यानंतर वडिलांच्या घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

एका उच्चशिक्षित कुटुंबातील या हैवानियतमुळे संपूर्ण जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे. ‘हुंड्याची हाव’ एका हसत्याखेळत्या मुलीचा बळी कशी घेऊ शकते, याचे हे सुन्न करणारे उदाहरण आहे.