
कल्याण रेल्वे स्थानकामध्ये मंगळवारी आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. धावत्या ट्रेनमधून उतरताना पाय घसरलेल्या महिला आणि तिच्या एक वर्षाच्या बाळाला आरपीएफचे साहाय्यक उपनिरीक्षक हेमंत भरगुडे यांनी तत्काळ धाव घेत वाचवले. दैव बलवत्तर म्हणून बाळासह आईचे प्राण वाचले. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

अंतिमा शुक्ला असे त्या महिलेचे नाव असून, ती तिचा एक वर्षाचा मुलगा सर्वज्ञ याच्यासह प्रयागराज ते मुंबई असा प्रवास करत होती. ट्रेन कल्याण स्थानकात येत असताना उतरण्याच्या प्रयत्नात तिचा तोल गेला आणि ती बाळासह प्लॅटफॉर्म व रेल्वेगाडीच्या मधील जागेत घसरली. मात्र, तेथे ड्युटीवर असलेल्या भरगुडे यांनी प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न लावता तातडीने धाव घेत दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले.











