
वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे बुधवारी (२२ एप्रिल) सकाळी रक्ताचा थरार घडला. एका लघुउद्योजकाच्या प्रेयसीने त्याच्या घरात शिरून पत्नीची निर्घृण हत्या केली. साधना महेंद्र सोनपेठकर (३८) असे मृताचे नाव असून, आरोपी शैला सुनील सोनार (४४) हिला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

बुधवारी सकाळी महेंद्र सोनपेठकर देवपूजा उरकून कारखान्यात गेले. त्यानंतर काही वेळातच आरोपी शैला सोनार त्यांच्या घरात घुसली. तिने स्वतःसोबत आणलेले कुलूप घराला आतून लावून घेतले आणि बॅगेतून पिस्तूल काढले. हे पाहून साधना आणि त्यांची सासू केशरबाई प्रचंड घाबरल्या. साधना आपल्या पतीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतानाच शैलाने त्यांच्यावर हल्ला केला.
सासूने पिस्तूल हिसकावलं, पण…
आपल्या सुनेला वाचवण्यासाठी ६० वर्षीय सासू केशरबाई यांनी जिवाची पर्वा न करता शैलावर झडप घातली. त्यांनी शैलाच्या हातातील पिस्तूल हिसकावून खिडकीबाहेर फेकून दिले. मात्र, शैला पूर्ण तयारीत आली होती. तिने तात्काळ आपल्या पर्समधून ‘स्प्रे’ काढला आणि सासू-सुनेच्या डोळ्यांवर फवारला. डोळ्यांसमोर अंधारी आल्याने केशरबाई हतबल झाल्या आणि याच संधीचा फायदा घेत शैलाने धारदार शस्त्राने साधना यांचा गळा चिरून खून केला.
पोलीस तपासात या प्रकरणाची काळी बाजू समोर आली आहे. महेंद्र आणि शैला यांची ओळख २००९ मध्ये एका कंपनीत झाली होती. शैलाने महेंद्र यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन गेल्या १६ वर्षांत तब्बल ३६ लाख रुपये उकळले होते. महिनाभरापूर्वी तिने जबरदस्तीने महेंद्रच्या घरात राहण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा पोलिसांनी तिला हुसकावून लावले होते. याच रागातून तिने हे भयानक कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
रक्ताने माखलेले हात धुतले आणि रचला आत्महत्येचा बनाव!
हत्येचा थरार घडल्यानंतर शैला सुमारे एक तास घरातच होती. तिने बाथरूममध्ये जाऊन रक्ताने माखलेले हात आणि चाकू धुतला. केशरबाईंच्या ओरडण्यामुळे शेजारी जमा झाले. पोलीस येणार असल्याचे समजताच शैलाने गळफास घेण्याचे नाटक करून आत्महत्येचा बनाव रचला. मात्र, पोलिसांनी दरवाजा तोडून तिला रंगेहाथ पकडले.
“आई वाचवा…” साधनेची ती शेवटची हाक
सासू केशरबाई यांनी दिलेली साक्ष काळजाचा थरकाप उडवणारी आहे. त्या म्हणाल्या, “पिस्तूल फेकल्यानंतर मला वाटलं आम्ही वाचू, पण त्या राक्षसिणीनं आमच्या तोंडावर काहीतरी फवारलं. समोर सगळं अंधारलं आणि साधनाच्या किंकाळ्या ऐकू आल्या. ती रक्ताच्या थारोळ्यात तडफडत ‘आई वाचवा’ म्हणत होती, पण मी हतबल होते.” या घटनेमुळे वाळूज आणि बजाजनगर परिसरात दहशतीचे वातावरण आहे. लासलगाव पोलिसांनी आरोपी शैला सोनारवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.










