
भोंदूगिरी आणि लैंगिक शोषणाचे अनेक गुन्हे दाखल असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. चार्टर्ड अकाउंटंट ललित पोफळे यांची तब्बल 8 कोटी 76 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात मध्यरात्री खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ललित पोफळे हे अशोक खरात याच्या ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहत होते. त्यामुळे खरातच्या आर्थिक व्यवहारांची त्यांना पूर्ण माहिती होती. याचाच फायदा घेत खरातने पोफळे यांना त्यांच्या आई-वडिलांच्या मृत्यूचा योग असल्याचे सांगून भीती घातली. हा मृत्यूचा योग टाळण्यासाठी आणि ‘अवतारपूजा’ करण्याच्या बहाण्याने खरातने पोफळे यांच्याकडून वेळोवेळी कोट्यवधी रुपये उकळले.

ललित पोफळे यांची यापूर्वी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान खरातच्या आर्थिक साम्राज्याविषयी आणि त्याने केलेल्या फसवणुकीविषयी महत्त्वाची माहिती समोर आली. पोफळे हे खरातच्या ट्रस्टचे महत्त्वाचे घटक असल्याने, या नव्या गुन्ह्यामुळे खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अशोक खरातवर आतापर्यंत लैंगिक शोषणाचे 8 आणि आर्थिक फसवणुकीचे 9 गुन्हे दाखल झाले आहेत. धर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करून त्यांना लुटणे आणि महिलांचे शोषण करणे, असा खरातचा कार्यपद्धती असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सरकारवाडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून, खरातच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी सुरू केली आहे.










